मुंबई : नुकतेच मुंबईतील खारघर परिसरात झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर 14 श्रीसदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला जात आहे. हे मृत्यू केवळ उष्माघातामुळे झाले नसून अयोग्य व्यवस्थापनामुळे झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी एक फोटो ट्विट करत गंभीर आरोप केला आहे. लोक अन्नपाण्यावाचून मरत असताना सत्ताधारी शाही भोजन घेत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्री आणि आयोजक जेवण करताना दिसत आहेत. खारघर येथे निष्पाप लोकांचे तहान-भूकेने जीव जात होते. सत्ताधारी मात्र शामियान्यात ‘शाही’ भोजनावर ताव मारत होते. सत्तेच्या नशेत भावना पण मेल्या आहेत, असे कॅप्शन या फोटोला चव्हाण यांनी दिले आहे.

अधिक वाचा  मोदी सरकारला झटका.. वक्फ कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सरकारला 7 दिवस वेळ तोपर्यंत नव्या कायद्याला स्थगिती

एक सदस्यीय समिती नियुक्त
खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. एका महिन्याच्या मुदतीत ही समिती याबाबतचा अहवाल सादर करेल. भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी, दक्षता घ्यावी, याबाबतही ही समिती शासनास शिफारशी करेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.