संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशीही गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षांच्या गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. त्याचवेळी राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले होते. दोन वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा गदारोळ सुरू झाला. यानंतर राज्यसभेचे कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू झाला होता. त्यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचा वारंवार गदारोळ पहायला मिळाला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनेकदा तहकूब करण्याची वेळ आली. विरोधी पक्ष अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी ‘जेपीसी’ स्थापन करण्याच्या मागणीवर ठाम होते. तर दुसरीकडे, लंडनमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने लावून धरली होती. याचे पडसाद अधिवेशानाच्या दुसऱ्या टप्प्यात पडल्याचे दिसून आले.

अधिक वाचा  चालत्या बसला एक्सप्रेस-वे वर आग, 8 भाविक भक्त जिवंत जळाले; 24 जण गंभीर थरकाप उडवणारा व्हिडिओ

आज सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. ‘जेपीसी’ची मागणी लावून धरली. त्याबाबत त्यांच्या हातात मागणीचे फलकही होते. यावर लोकसभा अध्यक्ष म्हणाले, “विरोधी सदस्यांच्या वागण्याने सभागृहाची प्रतिष्ठा कमी झाली आहे. त्यांनी नियोजितपणे कामकाजात व्यत्यय आणला आहे. असे वर्तन संसदीय व्यवस्थेच्या विरोधात आहे. ते सभागृहाच्या किंवा देशाच्या प्रतिष्ठेसाठी चांगले नाही. मात्र, विरोधी सदस्यांनी सभापतींच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत आंदोलन सुरूच ठेवले. अशा स्थितीत आपले समारोपीय भाषण संपवून सभापती बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याची घोषणा केली.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे मानहानीच्या खटल्यात दोषी ठरविल्याने लोकसभेच्या सदस्यत्व रद्द केले आहे. त्यांच्या अनुपस्थित विरोधकांनी संसदेत जेपीसीचा मुद्दा चांगलाच लावून धरल्याचे दिसून आले. सत्ताधाऱ्यांनीही राहुल गांधीनी माफी मागण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे कामकाज अनेकदा तहकूब करण्याची वेळ लोकसभा अध्यक्षांवर आल्याचे या अधिवेशनात दिसून आले.