पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात जनता कर्फ्यू असणार आहे, गुरुवारी जाहीर केले. पण तरीही काही लोकं जनता कर्फ्यू सुरु असताना क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरली होती. पोलीसांच्या ही गोष्ट निदर्शनास आली आणि त्यांनी या मुलांची विकेट काढल्याचे पाहायला मिळाले.
जनता कर्फ्यू सुरु असताना लोकांनी एकत्र येऊ नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. करोना व्हायरसशी लढा देण्यासाठी लोकांना आज घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण काही अतिउत्साही मुलांनी हा नियम धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळाले. पोलीसांनीही यावेळी त्यांना चांगलाच दिल्याचे समजते.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील काळा तलाव येथे मैदानात क्रिकेट खेळत असताना आठ जणांना पोलीसांनी पकडले आहे. पोलिस आयुक्तांनी आज घरातून कोणीही बाहेर पडू नये, असा आदेश काढला होता. या आदेशाचे पालन त्यांना करता आले नाही. त्याचबरोबर देशहितासाठी लोकांनी आज घरी रहावे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते. या आठ जणांना हेदेखील ऐकले नाही. त्यामुळे आम्ही या आठ जणांना अटक केली आहे. या आठ जणांवर १८८, २६९ आणि २९० या आयपीसी कलमांद्यावे कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती महात्मा फुले चौक येथील पोलीस स्थानकाने दिली आहे.
करोना विषाणू जगभरात अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. इटलीमध्ये आतापर्यंत हजारो नागरिक करोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडले आहेत. जागतिक पातळीवर शेकडो देशांमध्ये करोनाचा हाहाकार सुरू आहे. भारतातही करोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. करोना व्हायरस रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. या आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या महाराष्ट्रातील शहरांसह देश पातळीवरील अनेक शहरांमध्ये शुकशुकाट दिसत आहे. देशवासीयांना करोनाचा धोका गांभीर्याने घेतल्याचे हे द्योतकच म्हणावे लागेल. सायंकाळी ५ वाजता आपापल्या घरातून, घराच्या गच्चीवरून, खिडकीतून टाळ्यांचा कडकडाट करण्याचे आणि थाळी वाजवण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले होते.