पुणे : सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन व फरकाच्या रकमा पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आल्या नसल्याने आठ मार्च महिला दिन सेवानिवृत्त सर्व महिला शिक्षकांसह शिक्षक मंडळाच्या विरोधात आंदोलन करून आमरण उपोषण सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे.

एक जून 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या अनेक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन लागू करण्यात आलेले नाही. तसेच या शिक्षकांचे अनेक प्रश्न शिक्षण मंडळाच्या कडून प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. वारंवार मागणी करूनही शिक्षण प्रमुख याकडे दुर्लक्ष करीत असून उडवा उडवी चे उत्तरे देत आहेत. तसेच शिक्षकांना अपमानास्पद वागणूक देखील देण्यात येत असून यावर कारवाईची मागणी निवृत्त प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कल्याण संस्था यांच्या वतीने करण्यात आली आहे.

अधिक वाचा  मला त्या वाटेने जायचेच नाही कष्ट करायचेत! …म्हणून पत्रकार परिषद घेत नाही; अखेर मोदींनी दिलं हे उत्तर

सातव्या वेतन आयोगानुसार वेतन व फरकाच्या रकमा नेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50% अनुदान देण्यात येते परंतु पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षण संचालक पुणे विभाग यांच्याकडे अनुदानासाठी अद्याप पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने अर्ज करून अनुदानाची मागणी केली नाही.

अनेक शिक्षकांचा सातव्या वेतन आयोगाचा फरक व वेतन याची वाट पाहत स्वर्गवास देखील झाला आहे. पुणे महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असून यामध्ये काही आर्थिक घोटाळा होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. संघटनेच्या वतीने शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगानुसार फरक व वेतन देण्यात यावे तसेच विलंब करणाऱ्यांवर कठोर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.