पंढरपूर: महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व मंदिरांची दारे भाविकांसाठी बंद असून यात्रा-उत्सवही रद्द करण्यात आले आहेत. इतकं सगळं होऊनही पंढरपुरात मात्र रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ अद्याप कमी झालेली नाही.
राज्यभर लॉकडाऊन व संचारबंदी कठोरपणे लागू करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री वारंवार सूचना देत असताना पंढरपुरात मात्र वेगळंच वातावरण आहे. येथे रोज शेकडो वाहने राजरोसपणे रस्त्यावर येत असल्याने संचारबंदीचे तीन-तेरा वाजले आहे.
मुख्यमंत्र्यांनी करोनाचा धोका लक्षात घेऊन पंढरपूरची चैत्री यात्रा रद्द केली. केवळ नागरिक आणि भाविकांच्या आरोग्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र, याचे थोडेही भान पंढरपुरातील काही नागरिकांना नसल्याचे दिसत आहे. येथे रोज खरेदीची कारणे काढून शेकडो वाहने रस्त्यावर येत आहेत. त्यांच्या विरोधात पोलीस प्रशासन कोणतेच कडक पाऊल उचलत नसल्याने पोलिसांची भीतीच नागरिकांना शिल्लक राहिलेली नाही. याउलट सरकारचे नियम काटेकोरपणे पाळत घरातच राहणाऱ्या नागरिकांना अशा बेशिस्त लोकांमुळे करोनाचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आजपासून औषध दुकाने सोडून इतर सर्व दुकाने दुपारी चारनंतर बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. सध्या तरी सोलापूर जिल्ह्यात करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नसला तरी अशाप्रकारे कायदा मोडून राजरोसपणे पोलिसांच्या समोर मोकाट फिरणाऱ्यांवर कठोर कारवाईला सुरुवात न झाल्यास मात्र विठुरायाच्या पंढरीवरही करोनाची टांगती तलावर कायम राहणार आहे.

अधिक वाचा  आयफोन 16 लॉन्च होताच आयफोन 15, आयफोन 14 झाले स्वस्त, तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी घट!