भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारीला निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या जागेवर लक्ष्मण जगताप यांच्या घरातील व्यक्तीला संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये जगताप यांचे बंधु शंकर जगताप किंवा लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. जगताप यांचे सर्व पक्षीयांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंधांमुळे त्यांच्या घरातील कोणी उमेदवार असल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असेही बोलले जात आहे.

पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू होती. माजी नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे यांच्यापैकी एकाला मिळणार की गणेश बीडकर यांचाही विचार होणार होणार याची चर्चा सुरू झाली आहे. या तिघांच्या नावाशिवाय दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांच्या नावाचा विचार होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक टाळण्यासाठी शैलेश टिळक यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी कसबा मतदारसंघाचे नेतृत्व सलग २५ वर्षे केले आहे. गेली २५ वर्षे ते कसब्यातून आमदार होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली होती. कसबा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचे सातत्याने वर्चस्व राहिले आहे. हा मतदारसंघ भाजपासाठी पुण्यातला बालेकिल्ला आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर निवडणूक टाळण्यासाठी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी देण्यात येऊ शकते, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

अधिक वाचा  गोविंदा-कृष्णा अभिषेकमध्ये अखेर मिटलं भांडण; 8 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

निवडणूक आयोगाने चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याप्रमाणे येत्या २७ फेब्रुवारीला मतदान तर २ मार्चला मतमोजणी होणार आहे. प्रदेश पातळीवर बीडकर, रासणे व घाटे यांच्या नावाशिवाय शैलेश टिळक यांच्या नावावर चर्चा झाली असून शैलेश टिळक यांचे नाव अंतीम होण्याची शक्यता अधिक आहे.

शंकर जगताप यांच्यावर भाजपने आधीच महापालिकेची जबाबदारी दिली आहे. त्यांनी २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये मोठी जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीला कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे.

अधिक वाचा  केंद्र सरकार ‘या’ 5 सरकारी बँकांमधील हिस्सा विकण्याच्या तयारीत; काय आहे प्लॅन?

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम

अर्ज दाखल करण्याची मुदत : ७ फेब्रुवारी २०२३

अर्जांची छाननी : ८ फेब्रुवारी

अर्ज मागं घेण्याची मुदत : १० फेब्रुवारी

मतदान : २७ फेब्रुवारी

मतमोजणी आणि निकाल : २ मार्च