मुंबई: भाजप खासदार बृजभूषण सिंह पुरते अडकले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंनीच बृजभूषण सिंह यांच्यावर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेला बजरंग पुनिया आणि वर्ल्ड चॅम्पियनशीप मेडल जिंकणारी विनेश फोगाट यांच्यासह भारताच्या टॉप पैलवानांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर लैंगिक शोषणासह तानाशाहीचे आरोप केले. बृजभूषण सिंह आणि महिला शिबिरातल्या कोचनी पैलवानांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप विनेश फोगटनी केला आहे. एवढच नाही तर भारतीय कुस्ती महासंघाच्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचंही विनेश म्हणाली.
विनेश फोगटच्या आरोपांवर बृजभूषण सिंह यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. लैंगिक शोषणाची कोणतीही घटना घडलेली नाही. जर असं काही झालं असेल तर मी स्वत: फाशी लावून घेईन, असं बृजभूषण सिंह म्हणाले. विनेश फोगटनी ऑलिम्पिकमध्ये कंपनीचा लोगो असलेला पोशाख का घातला होता? मॅच हरल्यानंतर मी विनेशला प्रोत्साहित आणि प्रेरित केलं होतं, असा पलटवार बृजभूषण सिंह यांनी केला आहे. ‘लैगिंक अत्याचार हा गंभीर आरोप आहे. माझं नाव यात आलं असेल तर मी स्वत:च कशी कारवाई करू? मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहे,’ असं बृजभूषण सिंह म्हणाले.
बृजभूषण सिंह यांच्या कारभाराविरोधात भारताच्या दिग्गज कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलनाला बसले होते. या कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बृजभूषण सिंह यांना हटवलं जात नाही तोपर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार नाही, असा इशारा बजरंग पुनियाने दिला आहे. बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक, सरिता मोर, संगिता फोगट, सत्यव्रत मलिक, जितेंद्र किन्हा आणि सुमित मलिक यांच्यासह 30 पैलवानांनी जंतर-मंतरवर धरणं आंदोलन केलं. बृजभूषण सिंह 2011 पासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. 2019 साली बृजभूषण सिंह लागोपाठ तिसऱ्यांदा निवडून आले.