बारामती : राज्य सरकारने पालकमंत्र्यांच्या केलेल्या नियुक्ती बाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज प्रतिक्रिया व्यक्त करताना काहीसे आश्चर्य व्यक्त केले. काही मंत्र्यांकडे एका जिल्ह्याचे पालकमंत्री पद तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पद कसे काय सोपविण्यात आले याबाबत अजित पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले. आपण पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना माझ्या वेळ देताना नाकी नऊ येत होते. सहा जिल्ह्यांचे कामकाज ते कसे पाहणार हे त्यांचे त्यांनाच माहिती…. माझ्या त्यांना शुभेच्छा…. पालकमंत्री नेमले ही चांगली गोष्ट आहे, मात्र लोकांची कामे होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  अमिताभ बच्चन यांनी अयोध्येनंतर ‘या’ ठिकाणी विकत घेतली प्रॉपर्टी; किंमत ऐकूण बसेल धक्का

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अजित पवार यांनी आज हा मुद्दा छेडला. सरकार सत्तेवर कसे आले हे राज्याने पाहिले, गद्दारी केली की प्रलोभने दाखवली हे त्यांचे त्यांनाच माहिती, आता लोकांची कामे होणे गरजेचे आहे, पालकमंत्री पद म्हणजे कामाचा प्रचंड व्याप असतो.

अनेक समित्या व काम करावे लागते अनेक कामांच्या बाबत निर्णय घ्यावे लागतात सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस कसा काय वेळ देतील हे याबाबत अजित पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र असे असले तरी त्यांना शुभेच्छा देण्यासही ते विसरले नाहीत.

अधिक वाचा  IPL मॅचच्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगप्रकरणी तमन्ना भाटिया अडचणीत; बजावले समन्स

दरम्यान बारामती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना नोकर भरतीच्या मुद्द्यावरून नोकरीला लागल्यानंतर पालक आपल्या नातेवाईकांना पुन्हा बारामतीत बदली करण्यासाठी आग्रह करतात असे सांगत महाराष्ट्रात कुठेही काम करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. मला काटेवाडी वरून मुंबईला बारामतीरांनी पाठवले मी थोडाच परत आलो किंवा मला बारामतीलाच यायच अस म्हणालो, केलच ना मीही काम असे म्हणतानाच मी देखील काटेवाडीला येतो माझ्या आईला भेटतो, मात्र मी या भेटीचा फोटो काढत नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.