मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यात संघर्ष पाहण्यास मिळाला. पण, आता काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून राज्याबाहेरील व्यक्तीला संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हायकमांडच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातून इमरान प्रतापगढी यांचं नाव निश्चित झालं आहे. तसंच बिहारमधून कन्हैया कुमार, कर्नाटकमधून बी.व्ही. श्रीनिवास यांच्या नावाची चर्चा आहे. या तिन्ही नेत्यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस हायकमांड उत्सुक आहे.

पण, राज्यातील अनेक जण इच्छुक असताना बाहेरील नेत्याला संधी देत असल्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. इतर राज्यातील उमेदवार असल्यास क्रॉस व्होट करू, असा निर्धार आता महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस एक जागा जिंकू शकते, भाजप 2 आणि राष्ट्रवादी एक जागा जिंकू शकते. एक जागा सुरक्षितपणे जिंकण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अतिरिक्त मतांच्या जोरावर आणखी एका जागेवर काँग्रेस लक्ष ठेवून आहे.

अधिक वाचा  खरंच पवार कुटुंबात फूट का? सुळेंचं ते ‘स्टेटस’ खरं? अजितदादाचे अजब उत्तर; .. नवंही नाही अन् विशेषही नाही

काँग्रेस पक्षाकडून इमरान प्रतापगढी यांचं नाव निश्चित झालं आहे. महाराष्ट्रमधून राज्यसभासाठी इमरान प्रतापगढी नाव निश्चित झाल्याची विश्वासनिय सूत्रांची माहिती आहे. अल्पसंख्याकाला महाराष्ट्रामधून राज्यसभा उमेदवारी देण्यासाठी प्रियंका गांधी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. इमरान प्रतापगढी हे काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आहेत.

दरम्यान, शिवसेना पक्षाची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडे मांडावी आमची हीच भूमिका आहे. किमान समान कार्यक्रम अंतर्गत सरकारमधील सहकारी पक्षाला योग्य वाटा मिळाला पाहिजे. उद्या सांयकाळी 5 वाजता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सोबत दिल्लीत आमची बैठक आहे. सोनिया गांधी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भूमिका विषयी तक्रार केली होती यावर ही चर्चा करणार आहे. राज्यसभा उमेदवारवर चर्चा करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.