पुणे: पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मेट्रो प्रकल्पातील प्रत्येकी ६ किलोमीटर लांबीच्या दुहेरी भुयारी मार्गांचे काम शनिवारी (ता. ४) पूर्ण झाले. येत्या ९ महिन्यांत कसबा पेठ स्थानकाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे. पिंपरी चिंचवड – स्वारगेट मार्गावर रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यान सुमारे ६ किलोमीटरचा भुयारी मार्ग आहे. रेंजहिल्सजवळून मेट्रो भुयारी मार्गात प्रवेश करेल आणि स्वारगेटला पोचेल. त्यासाठी दोन बोगदे तयार करण्यात येत आहेत.

त्यातील दुसऱ्या बोगद्याचे काम शनिवारी झाल्याचे कसबा पेठ स्थानकात पहायला मिळाले. शिवाजीनगर ते कसबा पेठ आणि स्वारगेट ते कसबा पेठ हे दोन्ही बोगदे परस्परांना जोडले गेले. टाटा- गुलेरमार्ग कंपनीकडून या दोन्ही बोगद्यांचे आणि स्थानकांचे काम सुरू आहे.

अधिक वाचा  लोकसभा अखेरच्या टप्प्यात भाजप मंत्र्यांची तगडी फौज मुंबईत, केंद्रीय मंत्र्यांवरही भिस्त, मॅरेथॉन बैठकांचं नियोजन

स्वारगेट येथून ५ सप्टेंबर २०२१ रोजी पवना टीबीएम द्वारे बोगद्याच्या कामास सुरवात झाली होती. जमिनीपासून सुमारे २८ मीटर खाली स्थानक बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. यापूर्वीच शिवाजीनगरच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. भूमिगत स्थानकात दोन मार्गिका असणार आहेत. अप आणि डाऊन अशी मेट्रो धावेल. मेट्रो प्रशासनाने प्रकल्पातील सर्व बोगद्यासांठी तीन टीबीएमचा वापर केला आहे.

ही कामे प्रगतीपथावर

रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रोसाठी दोन स्वतंत्र बोगदे असतील. त्यात आता लोहमार्ग टाकणे, सिग्नलिंग यंत्रणा बसविणे आदी कामे सुरू झाली आहेत. आठ महिन्यांत ही कामे पूर्ण होतील. तसेच हवा खेळती राहण्यासाठी त्यात विशेष यंत्रणा बसविण्यात येणार असून पुरेशी प्रकाश व्यवस्थाही असेल. दरम्यान सिव्हील कोर्ट, कसबा पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट स्थानकांची कामे पुढील वर्षी मार्च दरम्यान पूर्ण होतील, असा विश्वास महामेट्रोचे महासंचालक हेमंत सोनावणे यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकरांचं खळबळजनक भाष्य, नियतीने ही वेळ कोणावरही आणू नये

हा क्षण अभिमानाचा

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, “पुणे मेट्रोच्या १२ किलोमीटर बोगद्याचे काम अत्यंत अचूक आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाने करण्यात आले. महामेट्रोसाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. पुण्यातील नागरिक आणि प्रशासकीय संस्थांच्या सक्रिय पाठिंब्यामुळेच हे काम वेगाने यशस्वी झाले आहे. दोन्ही शहरांतील मेट्रो प्रकल्प वेळेत काम पूर्ण करण्यासाठी महामेट्रो कटिबद्ध आहे.”