कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपची खेळी होती, असा गौप्यस्फोट त्यांचे पिता शाहू छत्रपती यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आदल्याच दिवशी शिवसेनेकडे बोट दाखवलं होतं. शाहू छत्रपतींच्या भूमिकेनंतर रविवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत शाहूंच्या भेटीसाठी थेट कोल्हापूरातील राजवाड्यावर दाखल झाले आहेत.

शिवसंपर्क अभियानासाठी संजय राऊत सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. संभाजीराजेंनी राज्यसभेतून माघारीची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राऊत कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यसभेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना तिकीट देण्यात आले आहे.

अधिक वाचा  दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, हात फ्रॅक्चर, खुब्याला मार

या राजकीय घडामोडींमध्ये राऊत हे शाहू छत्रपती यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या भेटीआधी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, शाहू महाराजांना भेटून त्यांना अभिवादन करणे, हे आमचे कर्तव्य आहे. आम्हाला जसा शाहू महाराजांविषयी आदर तसे संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयीही प्रेम आहे. आम्हाला त्याचं राजकारण करायचं नाही. ज्यांनी संभाजीराजेंना पुढं करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांची उडी फसली आहे. त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही.

अधिक वाचा  केंद्रीय ‘सामाजिक न्यायमंत्री’ आठवले न्यायाच्या प्रतीक्षेत; ‘शिर्डी’चा प्रभावी आग्रह की ‘आरपीआय’चे पेल्यातीलच वादळ?

छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी आदरणीय आहे. बाळासाहेब ठाकरे आणि सध्याच्या शाहू महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. कौटूंबिक नातं आजही आहे. काल त्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मी एवढंच म्हणालो की, कोल्हापूरच्या मातीत आजही प्रामाणिकपणा जिवंत आहे. शाहू घराण्याने आपली परंपरा कायम ठेवली आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

शाहू छत्रपतींनी कोणता गौप्यस्फोट केला?

संभाजीराजेंना अपक्ष लढवण्याची फडणवीस आणि भाजपची खेळी होती, असा खुलासा शाहूंनी शनिवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना केला. ते म्हणाले होते की, या सर्व राजकारणामागे भाजपचाच हात आहे. संभाजीराजेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली नाही, त्यामुळं छत्रपती घराण्याचा अपमान झाल्याचा आरोप होत आहे. पण यामुळं हा छत्रपती घराण्याचा अपमान झाला, असं म्हणता येणार नाही. ती संभाजीराजेंची राजकीय भूमिका होती. त्यामागे देवेंद्र फडणवीस आणि भाजपची खेळी होती. संभाजीराजेंना अपक्ष लढावं यासाठी त्यांनी भाग पाडलं.

अधिक वाचा  तुरुंगातून सरकार चालवणे शक्य आहे का? राज्यपालांचा स्पष्ट नकार; दिल्लीत आता काय होणार?

बहुजन समाजाच्या मतांत विभाजन करण्यासाठी भाजपने हा डाव टाकला होता. संभाजीराजे हे जानेवारी महिन्यापासून राज्यसभेसाठी प्रयत्न करीत होते. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतरच त्यांनी स्वराज्य संघटनेची स्थापन केली आहे. संभाजीराजेंना आता दीर्घकाळ लढा द्यावा लागणार असून, हा संघर्ष खूप मोठा आहे, असंही शाहू छत्रपतींनी म्हटलं आहे.