पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील मेट्रो स्थानकापर्यंत नागरिकांना पोहोचण्यासाठी पीएमपीएमएलकडून पूरस सेवा देण्याची सोमवारपासून सुरुवात झाली. पुण्यामध्ये दोन तर पिंपरी-चिंचवडमध्ये चार ठिकाणांहून वर्तुळाकार मार्गावरून ही सेवा कार्यरत राहणार आहे. या बससेवेमुळे नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे. या सेवेसाठी मिडी बसचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे. या सर्व मार्गावर बसच्या वीस फेऱ्या होणार असून दोन फेऱ्यांदरम्यान ४० मिनिटांची वारंवारिता असेल.

गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानक येथून पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा आणि सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा दाखवून पूरक सेवेचे उद्घाटन करण्यात आले. पुणे महामेट्रोचे संचालक विनोदकुमार अग्रवाल, संचालक अतुल गाडगीळ, जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनावणे, पीएमपीएमएलचे महाव्यवस्थापक सुनील गवळी, मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, चंद्रकांत वरपे, जनसंपर्क अधिकारी सतीश गाडे या वेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  मुंबई काँग्रेसला धक्का ; आणखी एक बडा नेता नाराज, स्टार प्रचारकपदाचा राजीनामाच देऊन टाकला

पूरक सेवेचे मार्ग

मार्ग क्र. १ : गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानक, संजीवनी हॉस्पिटल, खिलारेवाडी, म्हात्रे पूल, दत्तवाडी, आंबील ओढा, लोकमान्यनगर, टिळक चौक, डेक्कन कॉर्नर, गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानक

मार्ग क्र. २ : नळ स्टॉप मेट्रो स्थानक, एसएनडीटी, अलंकार पोलीस चौकी, विठ्ठल मंदिर, डी. पी. रस्ता, पटवर्धन बाग, मेहेंदळे गॅरेज, महादेव मंदिर, नळ स्टॉप मेट्रो स्थानक

मार्ग क्र. ३ : पिंपरी-चिंचवड मेट्रो स्थानक, गांधीनगर, एच. ए. कॉर्नर, अण्णासाहेब मगर स्टेडियम, टेल्को कंपनी, के. एस. बी. चौक, पिंपरी-चिंचवड मेट्रो स्थानक

मार्ग क्र. ४ : संत तुकाराम नगर मेट्रो स्थानक, वल्लभनगर एसटी स्थानक, फुलेनगर, एमआयडीसी कॉर्नर, पिंपरी डेपो, नेहरुनगर कॉर्नर, डी. वाय. पाटील महाविद्यालय पिंपरी, संत तुकाराम नगर मेट्रो स्थानक

अधिक वाचा  भाजपला मोठा धक्का ; चार नगरसेवक काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारासोबत?

मार्ग क्र. ५ : नाशिक फाटा भोसरी मेट्रो स्थानक, सी. आय. आर. टी., एमआयडीसी कॉर्नर, फिलीप्स कंपनी, इलेक्ट्कि भवन, क प्रभाग कार्यालय, ज्योती इंग्लिश स्कूल, नेहरुनगर कॉर्नर, वाय. सी. एम. हॉस्पिटल, संत तुकाराम नगर, नाशिक फाटा भोसरी मेट्रो स्थानक

मार्ग क्र. ६ : फुगेवाडी मेट्रो स्थानक, मार्शल कंपनी, कासारवाडी, कासारवाडी रेल्वे स्थानक, दत्त मंदिर, सृष्टी चौक, पिंपळे गुरव मनपा शाळा, काटेपूरम चौक, शितळादेवी चौक, सीएनजी पंप, फुगेवाडी मेट्रो स्थानक