पुणे : मोडी लिपीतील दुर्मीळ कागदपत्रे आणि पोथ्यांचे डिजिटायझेशन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारत इतिहास संशोधक मंडळाने हाती घेतला आहे. मंडळाच्या संग्रहात सुमारे दहा लाखांहून अधिक मोडी लिपीतील कागदपत्रे आणि ३० हजार पोथ्या आहेत.

भारत इतिहास संशोधक मंडळाचा बुधवारी (७ जुलै) १११ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने मंडळाचे चिटणीस पांडुरंग बलकवडे यांनी ही माहिती दिली. वर्धापनदिनाचे औचित्य साधून मंडळाच्या राजवाडे सभागृह येथे सकाळी अकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांना ज्येष्ठ इतिहास संशोधक सरदार आबासाहेब मुजुमदार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभत नाही; शरद पवारांवरील वक्तव्यानंतर रोहित पवारांची मोदींवर टीका

बलकवडे म्हणाले, मंडळाकडे सुमारे दहा लाखांहून अधिक मोडी लिपीतील कागदपत्रे, ३० हजार पोथ्या आणि इतिहासावरील ४० हजार संदर्भ ग्रंथ आहेत. त्यापैकी १२ हजार पोथ्यांचे डिजिटायझेशन आणि सूचीकरण करण्यात आले आहे. आता नॅशनल मॅन्युस्क्रिप्ट मिशनच्या माध्यमातून मोडी या कागदपत्रांचे आणि दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहेत. मंडळाकडे ३० हजार लघुचित्रांचा (मिनिएचर पेंटिंग्ज) संग्रह आहे. एका उद्योजकाच्या अर्थसाह्य़ातून मंडळाच्या राजवाडे सभागृहाची डागडुजी करण्यात येणार आहे. मंडळाचे इतिहास संशोधक संदीप भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षांपूर्वी मंडळाचा दफ्तरखाना लावून घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम महिन्याभरात पूर्णत्वाकडे जात आहे. १७०० रुमाल (कागदपत्रांचे बाड) व्यवस्थित करण्यात आली आहेत.

अधिक वाचा  कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास ‘सातवे आस्मान’पे, भाजप मात्र संभ्रमात

लोकाभिमुख करण्यासाठी आजीव सभासदत्व खुले

भारत इतिहास संशोधक मंडळाने तब्बल तीन दशकांनंतर आजीव सभासदत्व खुले केले. आजीव सभासदत्व होण्यासाठी ३० वर्षांपूर्वी पाच हजार रुपये शुल्क होते. मंडळाचे कामकाज लोकाभिमुख व्हावे आणि अधिकाधिक युवकांनी इतिहास अभ्यासाच्या प्रवाहात सहभागी व्हावे या उद्देशातून आजीव सभासद शुल्कामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. त्याचा परिणाम म्हणून साडेपाचशे जण मंडळाचे सभासद झाले आहेत. ३० वर्षांपूर्वी मंडळाचे साडेचारशे आजीव सभासद होते, अशी माहिती पांडुरंग बलकवडे यांनी दिली.