मुंबई : वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देणाऱ्या नेत्यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्रातील ओबीसी समूहाची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी आदी मागण्यांवर यावेळी चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
फोर्ट येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात रविवारी झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादीकडू पवार यांच्यासह जयंत पाटील, छगन भुजबळ आदी नेते होते. तर, ‘वंचित’चे माजी महासचिव नवनाथ पडळकर माजी आमदार हरीदास भदे, बळीराम शिरस्कार आदी नेते उपस्थित होते. विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील कुटुंबांना घरकूल योजना व भूमिहीनांना घरकुल योजना लागू करावी, मुस्लिम आरक्षणाचा निर्णय तत्काळ घ्यावा, महिलांना पदवीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण दर्जेदार व मोफत मिळावे आदी १२ मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. दरम्यान, वंचित बहूजन आघाडीच्या या माजी पदाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे आमचा फायदाच होईल, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.