पुणे : पुणे महापालिकेच्या कारभरावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सध्या संघर्ष पाहायला मिळतोय. आंबिल ओढ्याची घटना असो किंवा कचरा प्रश्न अजित पवारांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता असली तरी कारभारी अजित पवारच असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. भाजपचे तब्बल 100 नगरसेवक असून भाजपची पुणे महापालिकेत एकहाती सत्ता आहे. असं असताना राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महापालिकेत अजित पवारांच्या मर्जीतील आयुक्त आलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यामार्फत पालिकेत सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय.

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात पुणे महापालिकेच्या विविध प्रश्नांसाठी बैठक बोलावली आहे. पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांना या बैठकीचे निमंत्रण दिले असले तरी महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रण दिलेले नाही, असा आरोप करत भाजपने राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय.

अधिक वाचा  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री इंडस्ट्री सोडून पोहोचली प्रेमानंद महाराजांच्या शरणी

महापालिकेत सत्ता राबवण्यासाठी आयुक्तांचा वापर केल्याचा भाजपचा आरोप

काँग्रेस महापालिकेत सत्ता राबवण्यासाठी आयुक्तांचा वापर करत असल्याचा आरोप भाजप करत आहे. भाजपला कारभार करता येत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय. आंबिल ओढ्याची घटनेतही पालकमंत्री अजित पवारांचे नाव स्थानिक नागरिक घेत आहेत. खासदार सुप्रिया सुळे आंबिल ओढ्याच्या भेटीवेळी स्थानिक नागरिकांनी अजित पवारांच्या विरोधात घोषणा दिल्यात.

“भाजपची महापालिकेत सत्ता तरी राज्य सरकारकडेअंतिम निर्णय”
पुणे महापालिकेत सत्ता जरी भाजपची असली तरी अंतिम निर्णय राज्य सरकारकडे असतात. हे निर्णय घेताना अजित पवार पूर्णपणे त्यांच्या अधिकारांचा वापर करतात. दरम्यान, पुणे महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका काबीज करण्यासाठी अजित पवार पूर्णपणे त्यांच्या सत्तेचा, अधिकाराचा उपयोग करत असल्याचाही आरोप भाजपकडून होत आहे.