मुंबईः स्टँड-अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआनं शिवरायांवरील केलेल्या थट्टेमुळं शिवप्रेमींनी तिला चांगलंच थारेवर धरलं होतं. यानंतर या प्रकरणात मराठी अभिनेत्री केतकी चितळेनं उडी घेतल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. केतकी चितळेनं फेसबुक पोस्ट करत शिवप्रेमींवर टीका केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तिला चांगलंच खडसावलं आहे.

३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात, असं केतकी चितळेनं तिच्या पोस्टमध्ये लिहलं आहे. केतकीच्या या फेसबुक पोस्टनंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उडवली होती. त्यातच मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनीही तिच्या पोस्टवर उत्तर दिलं आहे.

अधिक वाचा  मुरलीधर मोहोळ यांचे प्रभाग 13मध्ये जंगी स्वागत; स्थानिक नागरिकांची उत्साही गर्दी

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि करोडो मावळ्यांच्या मनावर ते राज्य करतात. त्यामुळं कितीही शिकलेले असूद्यात, आपली सदसद्दविवेक बुद्धी जागी ठेवली नाही तर त्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही. महापुरुषांबद्दल बोलताना ताळतंत्र पाळलेच पाहिले, असं रुपाली पाटील यांना सांगितलं. महाराजांबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीला त्याची लायकी दाखवल्या शिवाय शंभर फटके हाणून एक मोजल्या शिवाय राहत नाही. याची दखल उच्च शिक्षण शिकूनही बुद्धी नसलेल्या लोकांनी घ्यावी, असा इशारा त्यांनी दिला आहे.

काय म्हणली होती केतकी चितळे?
शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात.

अधिक वाचा  वाढत्या तापमानामुळे मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आपला दवाखानाची आरोग्य सेवा सुविधा

बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात.

अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका.