नवी दिल्ली : लडाखच्या जवळपास ३८,००० स्क्वेअर किलोमीटर भूभागावर चीननं कब्जा मिळवला असल्याची माहिती भारत सरकारकडून देण्यात आलीय. अरुणाचल प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचं अभिन्न अंग असल्याचंही सरकारनं संसदेत स्पष्ट केलंय.
लोकसभेत एका प्रश्नाचं लिखित स्वरुपात उत्तर देण्यात आलं. यामध्ये, भारत सरकारनं पाकिस्तानला जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करण्याची तंबी दिलीय.
‘भारत आणि चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमेबद्दलचा वाद आहे. पूर्व सेक्टरमध्ये चीन अरुणाचल प्रदेशात जवळपास ९० हजार स्क्वेअर किलोमीटरच्या भूभागावर आपला दावा करतो. चीनच्या कब्जात भारताचा जवळपास ३८ हजार स्केअर किलोमीटरचा भूभाग आहे, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी संसदेत दिली.
भूभाग भारताचा… करार पाकिस्तान-चीन दरम्यान
चीन आणि पाकिस्तान दरम्यान २ मार्च १९६३ रोजी तथाकथित ‘सीमा करारां’तर्गत इस्लामाबादनं पाकिस्तान अधिकृत काश्मीरचा ५१८० स्क्वेअर किलोमीटर भारतीय भूभाग चीनला देऊन टाकलाय, असंही त्यांनी म्हटलं.
भारताच्या सैद्धांतिक मतानुसार, अरुणाचल प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश असलेला जम्मू-काश्मीर तसंच लडाख हे भारताचे अभिन्न अंग आहेत आणि भविष्यातही राहतील. याची समज चीनला अनेकदा देण्यात आलेली आहे, असं केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांनी म्हटलं. ते संसदेद्वारे १९९४ मध्ये पाकिस्तान अधिकृत काश्मीरवर संमत एका प्रस्तावावर उत्तर देत होते.
पाकिस्तानच्या बेकायदेशीर कब्जा असणाऱ्या भागासहीत सर्व भारतीय भूभागावर सुरु असणाऱ्या हालचालींवर भारत सरकारची नजर आहे, असंही त्यांनी आणखी एका प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट केलं. बेकायदेशीपणे ताब्यात घेतलेला भूभाग रिकामा करण्याची समज आम्ही पाकिस्तानला दिलीय. तसंच पाकिस्तानला या भागात मानवाधिकार उल्लंघन आणि कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करण्याबद्दलही चेतावणी दिली आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
आम्ही २२ फेब्रुवारी १९९४ रोजी, केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर, लडाख भारताचा अभिन्न अंग आहेत, अशा संसदेच्या दोन्ही सदनात संमत करण्यात आलेल्या प्रस्तावासोबत आहोत आणि सरकारची हीच भूमिका कायम राहील, असंही मुरलीधरन यांनी स्पष्ट केलं.