गडचिरोली : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. पण अशाही परिस्थितीत माओवाद्यांनी डोकं वर काढलं आहे. धक्कादायक म्हणजे, माओवाद्यांना तब्बल 2 कोटी 20 लाखांची रसद पुरवली जात असल्याचा संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
सिरोंचा लगत महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील तपासणीत 2 कंत्राटदारांकडून 2 कोटी 20 लाख रुपयाची रक्कम पोलिसांनी बुधवारी जप्त केली होती. तेंदूपत्ता कंत्राटराकडून 2 कोटी 20 लाख रुपये जप्तप्रकरणी माओवाद्यांना आर्थिक मदतीच्या संशयावरुन चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तेंदूपत्ता हंगाम सुरू असून अतिसंवेदनशील भागात तेंदुपत्ता तोडायचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटराकडून माओवाद्यांना आर्थिक मदत देण्यासाठी नेण्यात येतं असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं. त्यामुळे UPA बेकायदेशीर प्रतिबंधक कायद्यान्वये तेलंगणाच्या बडया कंत्राटदारासह चौघांवर सिरोंचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सृजनाक्का ठार झाल्याने माओवाद्यांना हादरा
दरम्यान, गेल्या दोन महिन्यात माओवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहे. मे महिन्यात माओवाद्याच्या विभागीय समितीची सदस्य असलेली जहाल महिला माओवादी सृजनाक्का पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली होती. सी सिक्स्टी कमांडो पथकासोबत सिनभट्टीच्या जंगलात ही चकमक झाली होती.
घटनास्थळी जहाल महिला माओवादी सृजनाक्काच्या मृतदेहासह एके 47 अत्याधुनिक बंदूक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आली आहे. सृजनाक्कावर हत्या, पोलीस दलावर हल्ल्यासह जाळपोळ आणि एकूण 144 गुन्हे दाखल होते. कसनसूर आणि चातगाव या दोन दलमचे नेतृत्त्व सृजनक्काकडे होते. त्यामुळे माओवादी सृजनाक्काच्या हत्येच्या निषेधार्थ माओवाद्यांनी 20 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंद पाळून 4 वाहनांची जाळपोळ केली होती.

अधिक वाचा  कॉलर सकाळी उडो की संध्याकाळी, कॉलर… उदयनराजे यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल