मुंबई: औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर (Sambhajinagar) असं करण्याची मागणी करणाऱ्या भारतीय जनता पक्षावर सुप्रसिद्ध गायक विशाल दादलानी (Vishal Dadlani slams BJP) यानं जोरदार टीका केली आहे. ‘लोक तुम्हाला मूर्ख वाटतात का?’ असा खरमरीत सवाल दादलानी यानं केला आहे.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या त्या शहराच्या नामांतराचा मुद्दा गाजत आहे. नामांतराचा आग्रह धरणारी व कटाक्षानं औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असाच करणारी शिवसेना काँग्रेससोबत सध्या राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेण्यास शिवसेनेला मर्यादा आहेत. हेच ध्यानात घेऊन शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळं येत्या महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा, त्यातही औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा भाजपनं लावून धरला आहे.
पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मागील आठवड्यात औरंगाबादला गेलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नामांतराच्या मागणीचा पुनरुच्चार केला होता. ‘आम्ही छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजांचे वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळं औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ असं नामकरण झालंच पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. ‘नामांतराच्या बाबतीत ज्या काही तांत्रिक त्रुटी आहेत, त्या लवकरात लवकर दूर केल्या गेल्या पाहिजेत,’ असंही ते म्हणाले होते.
पाटील यांच्या या वक्तव्यानंतर दादलानी यानं ट्विट केलं आहे. ‘पाच वर्षे तुम्ही सत्तेत होतात, तेव्हा नाव बदललं नाही. आता सत्तेपासून लांब झालात की काही महिन्यात नामांतर आठवलं. पुन्हा सर्कस सुरू झाली. काय साहेब? लोक तुम्हाला मूर्ख वाटतात का?,’ असं खोचक ट्विट दादलानी यांनी केलं आहे.