आगामी विश्वचषकासाठी मंगळवारी टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी याबाबत मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल आणि रोहित यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. रिंकू सिंहला का वगळलं, हार्दिक पांड्याची निवड, विराट कोहलीचा स्ट्राईक रेट अन् शिवम दुबे याच्या गोलंदाजीबाबत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. पत्रकार परिषदेत नेमक काय काय झालं… पाहूयात..
शिवम दुबेची गोलंदाजी –
शिवम दुबेच्या गोलंदाजीबाबत अजित आगरकर म्हणाला की, शिवम दुबे यानं आयपीएलमध्ये एकही षटकही गोलंगदाजी केली नाही, हे दुर्देवी आहे. पण तो एक शानदार अष्टपैलू खेळाडू आहे. जो रेड बॉल क्रिकेटमध्ये नियमित गोलंदाजी करतो. त्यामळेच हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांची विश्वचषकासाठी निवड करण्यात आली आहे. गरज पडल्यास तो विश्वचषकात गोलंदाजी करेल.
चार फिरकी गोलंदाज –
गोलंदाजीबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, मला विश्वचषकासाठी चार फिरकी गोलंदाज हवे होते. सामने सकाळी दहा वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे कदाचीत चार फिरकी गोलंदाज घेऊन जाणं आपल्यासाठी फायद्याचं ठरेल.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर काय म्हणाला रोहित –
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, माझ्या क्रिकेट करियरमध्ये मी अनेक कर्णाधाराच्या नेतृत्वात खेळलो आहे. माझ्यासाठी ही काही नवी गोष्ट नाही. एक खेळाडू म्हणून सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न असतो. मागील महिनाभरापासून मी हेच काम करतोय.
मध्यक्रममध्ये विस्फोटक फलंदाजाची गरज –
आपले आघाडीचे फलंदाज चांगली कामगिरी करत आहे. मिडल ऑर्डरमध्ये विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची गरज होती. त्यामुळे आम्ही शिवम दुबे याला संधी दिली. शिवम दुबे याला आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर संघात स्थान दिले आहे. त्याआधी त्यानं अनेक सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. आताच प्लेईंग 11 बद्दल सांगू शकत नाही. अमेरिकामध्ये गेल्यानंतर खेळपट्टी आणि कंडिशन पाहून प्लेईंग 11 चा निर्णय घेण्यात येणार आहे.
रिंकू सिंहची निवड का नाही ?
रिंकू सिंह याच्याबाबत खूप विचार झाला. त्याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय कठीण होता. त्यानं कोणतीही चूक केली नाही. पण कॉम्बिनशन महत्वाचं आहे. त्याआधारावरच संघाची निवड कऱण्यात आली. संघाला एका अतिरिक्त गोलंदाजाची गरज होती. त्यामुळेच रिंकूची निवड झाली नाही. त्याला राखीव खेळाडूमध्ये ठेवण्यात आली आहे.
केएल राहुल संघाबाहेर का ?
ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना विश्वचषकासाठी विकेटकीपर म्हणून टीम इंडियात संधी दिली. राहुल याचा पत्ता कट झाला. पण त्यानंतर मात्र जोरदार चर्चा सुरु झाली. अभिनेता रितेश देशमुख यानेही केएल राहुलसाठी ट्वीट केले होते. राहुलची निवड का झाली नाही? याबाबत आगरकरनं सांगितलं. तो म्हणाला की, केएल राहुल शानदार फलंदाज आहे. पण आम्हाला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूची गरज होती. केएल राहुल आयपीएलमध्ये टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करत आहे. कोणत्या स्लॉटमध्ये कोणता खेळाडू हवा, त्यावरच खेळाडूची निवड करण्यात आली. मधल्या षटकात केएल राहुलपेक्षा पंत आणि संजू यांची कामगिरी चांगली आहे. दुसऱ्या हापमध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसन जबाबदारीनं फलंदाजी करतील, त्यामुळे त्यांची निवड झाली.
हार्दिक पांड्याची निवड का ?
हार्दिक पांड्यामुळे संघ संतुलित होतो, कर्णधाराला जास्त पर्याय मिळतात, दुसरा खेळाडू निवडणं कठीण असे अजित आगरकरने सांगितलं. अजित आगरकर म्हणाला की, उपकर्णधारपदाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. हार्दिक पांड्याने क्रिकेटपटू म्हणून काय केले, हे सर्वांना माहितेय. खेळाडू म्हणून त्याला बदलणे कठीण आहे. हार्दिक पांड्यामुळे कर्णधारालाही बरेच पर्याय उपलब्ध होत आहे. तो आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीर्घ विश्रांतीनंतर परत येत आहे.
विराट कोहलीचा स्ट्राईक रेट
आयपीएलमध्ये विराट कोहलीनं संथ शतक केले होते. तेव्हापासून त्याच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. तो फिरकीविरोधात धावा काढू शकत नाही, असेही सांगण्यात येत होते. विराट कोहलीने सर्वांना फलंदाजीनं उत्तर दिलं. पण तरीही आज विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना अजित आगरकर म्हणाला की, ” विश्वचषकाचा संघ निवडताना सिलेक्टर्समध्ये विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवर कोणतीही चर्चा झाली नाही. विराट कोहलीचा फॉर्म सध्या शानदार आहे. आयपीएलमध्ये तो धावांचा पाऊस पाडतोय. विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटबाबत कोणतीही चिंता नाही.”
विराट कोहली सलामीली येणार ?
विश्वचषकात विराट कोहली सलामीला येणार का? याप्रश्नाचं उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, खेळपट्टी आणि कंडिशन पाहिल्यानंतरच सलामीच्या जोडीचा विचार केला जाईल. आताच त्याबाबत बोलणं उचीत नाही.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवेंद्र, चहल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू – शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.
टी20 विश्वचषक गट –
अ गट – भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब गट – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट – न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड गट – दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ