मुंबई: ‘एखाद्या युद्धात आघाडीवरचा सैनिक जसा जिवाची बाजी लावून लढतो, त्याचप्रमाणे आपले डॉक्टर, नर्स व इतर आरोग्य कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून अथक लढत आहेत. अवघा देश आपल्या कुटुंबीयांसोबत घरात असताना हे कर्मचारी कुटुंबापासून, मित्रमंडळींपासून दूर राहून सेवाभाव जपत आहेत. त्यांचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे आहेत,’ अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा गौरव केला आहे. तसंच, त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
राज्यातील सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उद्देशून टोपे यांनी एक पत्र लिहिलं आहे. त्यात टोपे यांनी या कर्मचाऱ्यांना सैनिकाची उपमा दिली आहे. राज्यात ‘करोना’चा शिरकाव झाल्यानंतर सर्वात आधी तुम्ही त्याला सामोरे गेलात. या युद्धाचं नेतृत्व केलंत. लढाईत झोकून देऊन काम करत आहात. तुमचं हे साहस अभिनंदनीय आहे. तुमच्या या कार्याला मी सलाम करतो. तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळे आतापर्यंत राज्यातील ३९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तुम्ही दाखवत असलेल्या धीरामुळे रुग्णांना मानसिक बळ मिळतेच आहे, पण आम्हालाही काम करण्याचं पाठबळ व प्रोत्साहन मिळत आहे, असंही टोपे यांनी पत्रात म्हटलं आहे.
‘करोनाला हरविण्यासाठी आपली लढाई अशीच सुरू ठेवू या. ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश तुम्ही सर्वसामान्यांना दिला आहे. तुम्ही देखील तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, असा सल्ला देतानाच, ‘काही सूचना असतील तर माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा, असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

अधिक वाचा  मुख्यमंत्र्यांसोबत आलेल्या पोलिसांच्या हातामध्ये त्या जड बॅगा कसल्या? ठाकरे गटाचा सवाल