गोरखपूर : उत्तर प्रदेशात करोनाचा पहिला बळी गेलाय. गोरखपूरमध्ये करोना संक्रमित असलेल्या एका २५ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय. सोबतच, हा व्यक्ती ‘कोविड १९’चा सर्वात कमी वयाचा बळी ठरलाय. देशात आत्तापर्यंत झालेल्या ३५ मृत्यूंमध्ये अधिक वृद्धांचा समावेश आहेत.
यापूर्वी, बिहारच्या पाटणामध्ये सर्वात कमी वयाच्या अर्थात ३८ वर्षांच्या एका व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला होता. गोरखपूर जिल्ह्यातील मृत्युमुखी पडलेला तरुण केवळ २५ वर्षांचा असल्याचं समोर येतंय. या तरुणाचा मृत्यू सोमवारी झाला होता. त्यानंतर त्याचे सॅम्पल लखनऊस्थित केजीएमयूला धाडण्यात आले होते. त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफला क्वारंटाईन करण्यात आलंय. गोरखपूरच्या बीआरडी रुग्णालयात हायअलर्ट घोषित करण्यात आलाय. तसेच हा रुग्ण गोरखपूर आणि बस्तीतल्या ज्या लोकांच्या संपर्कात आला होता त्यांचाही शोध सुरू आहे. या सर्वांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल. मेडिकल स्टाफला आयसोलेट करण्यात आलंय.
भारतामध्ये करोनाच्या समोर आलेल्या आकड्यांमुळे चिंता आणखी वाढताना दिसतेय. कारण करोना आता लहानग्यांपर्यंतही अगदी सहज पोहचोय. इंदूरमध्ये आढळलेल्या ९ करोनाबाधित एकाच कुटुंबातील आहेत. इंदूरच्या तंजीम नगरमध्ये राहणाऱ्या या कुटुंबातील तीन लहान मुलांचे रिपोर्टही करोना पॉझिटिव्ह आले आहेत. या मुलांचं वय ३, ५ आणि ८ वर्ष आहे. यापूर्वी कर्नाटकात एक १० महिन्यांची मुलगीदेखील करोना पॉझिटिव्ह आढळली होती.