चीनमधील करोनाची साथ आटोक्यात येत असताना इतर देशात करोना पसरल्याने त्या संधीचा फायदा घेत चिनने आता बहुतांश कारखान्यात मास्क तयार करण्याचे काम सुरू केले असून त्यातून बक्कळ पैसा कमावण्याचा त्यांचा इरादा आहे. मात्र असं असतानाचा दुसरीकडे चीनमधून इतर देशामध्ये पाठवले जाणारे मास्क हे निकृष्ट दर्जाचे असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी स्पेनने चीनमधून आलेले करोना चाचणीचे टेस्ट कीट परत न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नेदरलँडनेही अशाप्रकारचा निर्णय मास्कसंदर्भात घेतला आहे. नेदरलँडमध्ये चीनमधून आयात करण्यात आलेले मास्क हे दर्जा मानकांची पूर्तता करणारे नसल्याचे चाचण्यांमधून निदर्शनास आलं आहे. त्यामुळेच हे मास्क वितरित न कऱण्याचा निर्णय नेदरलँडमधील यंत्रणांनी घेतला आहे.
नेदरलँडला चिनी उत्पादकांकडून २१ मार्च रोजी हे मास्क मिळाले होते. हे मास्क आधी आरोग्य व्यावसायिकांना वाटण्यात आले. या मास्कचा दुसरा टप्पा (लॉट) नेदरलँडला दिला जाणार होता. मात्र त्याआधीच नेदरलँडने दुसऱ्या टप्प्यातील मास्कची आयात थांबवण्याचा निर्णय घेतला. देशामध्ये आयात करण्यात आलेल्या मास्कचीच चाचणी करण्याची वेळ नेदरलँडवर आली आहे. हे मास्क निकृष्ट दर्जाचे असल्याचे चाचण्यांमधून स्पष्ट झालं आहे. यापुढे देशामध्ये जे मास्क आयात केले जातील त्याची कडक तपासणी करुनच त्यांना देशामध्ये वितरित केलं जाणार असल्याचे नेदरलँडमधील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. नेदरलँडने सहा लाख मास्कची ऑर्डर रद्द केल्याचे वृत्त आहे.
टेस्ट कीटही सदोष
याआधी मागील आठवड्यामध्ये स्पेननेही चीनमधून आयात केलेले करोना चाचणीचे टेस्ट कीट सदोष असल्याचा आरोप केला होता. इटलीपाठोपाठ सर्वाधिक जिवतीहानी झालेल्या स्पेनने चीनमधून मागवलेले करोडो टेस्टींग कीट परत केले होते. या टेस्टींग कीटच्या मदतीने केलेल्या चाचण्या बरोबर येण्याचे प्रमाण केवळ ३० टक्के असल्याचं स्पेनमधील आरोग्य यंत्रणांचे म्हणणं होतं, असं वृत्त युरोन्यूजने दिलं होतं. तुर्कीनेही चीनमधून आयोत करण्यात आलेल्या करोना तक्काळ चाचणीसाठीचे टेस्ट कीट हे देशातील आरोग्य मानांकनांनुसार नसल्याचे म्हटले होते. करोनामुळे आधीच अनेक देश आर्थिक संकटात असताना अशाप्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या पुरवठ्याबद्दल चीनी वस्तूंविरोधात जगभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
चीनमध्ये मास्क उद्योगला भरभराटीचे दिवस
ईशान्य चीनमध्ये पाच ठिकाणी एन ९५ मास्क तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून चीनमध्ये साथ फेब्रुवारीमध्ये जोरात असताना ग्वान शिनझे यांच्या कंपनीने मास्कचा नवा कारखाना सुरू केला होता. आता तर या ३४ वर्षीय व्यक्तीचा मास्कचा धंदा बरकतीत आला असून त्यांनी इटलीसह अनेक देशात मास्क पाठवणे सुरू केले आहे. पहिल्या दोन महिन्यातच चीनमध्ये ८९५० उत्पादकांनी मास्कची निर्मिती सुरू केली होती. हुबेई व वुहाननंतर करोना विषाणू इटली, अमेरिका, स्पेन, ब्रिटन या देशात पसरला असून आता त्या संधीचा फायदा त्यांनी घेतला आहे. एन ९५ मास्क तयार करणाऱ्या डोंगग्वान शहरातील कंपनीचे व्यवस्थापक शी शिनहुई यांनी सांगितले की, मास्कच्या माध्यमातून आता आम्ही भरपूर पैसा कमावणार आहोत. पूर्वी या धंद्यात कमी नफा होता आता भरपूर नफा होत आहे. रोज ६० ते ७० हजार मास्क आम्ही तयार करीत आहोत. क्वी ग्वांगटू यांनी सांगितले की, आम्ही मास्क तयार करण्याच्या यंत्रणेत ७ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. २५ जानेवारीपासून आम्ही मास्कची निर्मिती करीत आहोत. आम्ही सत्तर जीवरक्षक उपकरणे प्रत्येकी ७१ हजार डॉलर्सला विकली आहेत. अजून १४ दशलक्ष डॉलर्सच्या उपकरणांची मागणी हातात आहे.
मास्कला प्राधान्य
झेजियांगमध्ये वेनझाऊच्या एकाने कापड निर्मितीचा मूळ उद्योग सोडून मास्क निर्मिती सुरू केली आहे. मास्कसाठी जे कापड लागते त्याच्या किमती टनाला १० हजार युआन वरून चार लाख ८० हजार युआन झाल्या आहेत. चीनमधून सध्या १० लाख मास्क इटलीला पाठवले जात आहे. दक्षिण कोरियातूनही त्याला मोठी मागणी आहे. चीनमधील डोंगग्वान हे मास्कचे जगातील मोठे उत्पादन केंद्र ठरले आहे.

अधिक वाचा  निर्णय थेट…अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीच, अनेकांचे स्वप्न भंगलं