मुंबई: देशात करोना व्हायरसचा विळखा वाढताना दिसत आहे. करोनाचा संसर्ग अजून वाढू नये यासाठी दूरदर्शनने एक रामबाण उपाय काढला आहे. ९० च्या दशकात प्रसारित झालेल्या रामायण मालिकेला पुन्हा दाखवण्याचा निर्णय दूरदर्शनने घेतला. २८ मार्चपासून सकाळी ९ ते १० आणि रात्री ९ ते १० या दोन वेळेत रामायण प्रसारित होत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका पुन्हा प्रसारित करण्यात येणार आहे.
खासदार आणि अभिनेते यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती माहिती प्रेक्षकांना दिली होती. पण या मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचं ही अमोल कोल्हे यांनी शेअर केलं आहे.
अमोल कोल्हेची प्रेक्षकांना ‘गुड न्यूज’, पुन्हा दिसणार संभाजी
अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, त्यात त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले आहेत. ‘आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपण झी ग्रुपसोबत केलेल्या पत्रव्यवहारामुळं महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्वराज्यरक्षक संभाजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धन्यवाद!’, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.