नवी दिल्ली : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची लढाई निर्णयक ठरण्याची शक्यता बोलली जात आहे. त्यासाठी सरकारची दोन शिष्टमंडळं त्यांच्या भेटीसाठी लोणावळ्यात दाखल झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील जरांगेंशी ऑनलाईन संवाद साधतील असं सुत्रांकडून कळतं आहे.

“सरकारच्यावतीनं शिष्टमंडळ इथं चर्चेसाठी आलं आहे. पण मी आधी लोकांशी चर्चा करणार नंतर शिष्टमंडळाशी चर्चा करणार. दोन शिष्टमंडळं आली आहेत एक जुनं आणि एक नवं. जुनं शिष्टमंडळ म्हणजे विभागीय आयुक्तही भेटीसाठी आले आहेत. पण आधी मी मराठा समाजाशी चर्चा करतो, तोपर्यंत सर्व गाड्यांची तोंडं मुंबईकडं करुन ठेवायला सांगतो” असं जरांगेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

अधिक वाचा  माढ्यावरून राजकारण पेटलं; फडणवीसांसोबत भाजप नेत्यांची खलबतं; राष्ट्रवादीला दिला इशारा

जर शिष्टमंडळाकडं समाजाचं हित असेल, आमच्या मागण्या आम्ही म्हणू तशा असतील तर बघू नसल्या तर मुंबईला जाऊ. अद्याप शिष्टमंडळाशी माझी कसलीही चर्चा झालेली नाही. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून पुढे तर आम्ही जाणारच आहोत, असंही जरांगे यावेळी म्हणाले.

२६ तारखेला मराठा समाज मुंबईकड येणार. मी आधीच सांगितलं होतं, मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा समाज असणार आहे. आम्हाला फक्त आरक्षण मिळालं पाहिजे ते कुठंही दिलं तरी चालेल. मग लोणावळ्यात, नवी मुंबईत किंवा आझाद मैदानात दिलं तरी चालेल, असंही यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.