मुंबई दि. २९ (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती मुख्य कार्यालयाच्या वतीने सत्यशोधक समाजाचे संस्थापक, थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा येथे १३३ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करीत आदरांजली अर्पण करण्यात आली.

सदर प्रसंगी आदर्शांच्या प्रतिमांस पुष्पसुमन अर्पण करून समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे यांनी प्रस्ताविक सादर करताना समतेचे पुरस्कर्ते, शेतकरी आणि बहुजन समाजाला केंद्रस्थानी ठेवून समतावादी विचारांची मांडणी करणारे, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करणारे, सतीप्रथा, विधवा केशवपन सारख्या जुलमी प्रथांचा बिमोड करीत चूल आणि मूल या जोखडात अडकलेल्या स्त्रीला बंधनमुक्त करीत स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, विधवा पूर्णविवाह घडवून आणणारे, सावकारी पाशातून शेतकरी व गोरगरिबांना सोडवत बुरसटलेल्या जातीव्यवस्थेवर आसूड ओढत धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून भारतीय समाजाला मुक्त करत क्रांतीची ज्योत पेटविणारे क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांचे कार्य शब्दात व्यक्त करण्यास शब्द ही अपूरे पडतील अशी प्रस्तावना मांडीत कार्यक्रमाची सुरवात केली व सूत्रसंचालनाची धुरा ही यशस्वीपणे पेलवली.

अधिक वाचा  यापुढे कोणतीही बिनविरोध निवडणूक होणारं नाही का?यामुळं मतदारांचा हक्क बाधीत! ‘सर्वोच्च’मध्ये याचिका

सदर कार्यक्रमास उपकार्याध्यक्ष चंद्रमणी तांबे, अतिरिक्त सचिव साळवी, यशवंत कदम, रवींद्र शिंदे, विभाग प्रतिनिधी राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, सदस्य अशोक कदम, पतपेढीचे उपाध्यक्ष संजय कापसे, कोषाध्यक्ष गायकवाड, कार्यालयीन सचिव संजय मोहिते, भाई जाधव आदी मान्यवर तसेच गटक्रमांक १३ मधील सर्व शाखांचे पदाधिकारी, महिला मंडळ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात लक्ष्मण भगत यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जीवनपट व कार्याचा आढावा घेत ज्या काळात भारतीय संस्कृती व समाज पूर्णपणे मनुस्मृती व ब्राम्हणशाहीच्या अंकुशा खाली दबला होता त्याकाळात त्या जुलमी व्यवस्थेचा कणा मोडीत त्यातील अनेक अमानवीय प्रथा, व्यवस्था बंद करीत समाजसुधारण्याचे जे कार्य फुलेंनी केले ते करणे सहजशक्य नव्हते किंबहूना त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना आपले गुरू मानले, काळाच्या ओघात विस्मृतीस जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा शोध घेऊन महाराजांवर पहिला पोवाडा लिहीत पहिली शिव जयंती साजरी करत समाजात महाराजांच्या विचारांना पुनर्जीवित करण्याचे महत्कार्य ही फुलेंनी केले म्हणून महात्मा फुले यांचे कार्य, संघर्ष व विचार आपण घरा घरात रुजविले पाहिजेत असे प्रतिपादन केले.

अधिक वाचा  बीडमध्ये परीक्षा केंद्रावर राडा ! 2 विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकास गजाने मारहाण

सरतेशेवटी राजेश घाडगे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून महात्मा ज्योतिबा फुलेंना मानवंदना देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.