पुणे : जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे. यामुळे ग्रामीण भागाचा बाधित दरही कमी येत नसल्याने निर्बंध उठवण्यास प्रशासनाला अडचणी येत आहे. त्यात ४२ गावांत कोरोनाबाधित वाढत असल्याने या गावात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात यावा आणि प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या.

ग्रामीण भागाचा रुग्णबधितांचा दर आणि हॉटस्पॉट गावांची संख्या आटोक्यात आणण्याची जिल्हा परिषदेतर्फे धडक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अनेक कोरोनाबाधित आढळले असले तरी तीन आठवड्यांपासून हॉटस्पॉट गावांची संख्या ही कमी होण्याऐवजी वाढत आहे. गेल्या आठवड्यात हॉटस्पॉट गावे ही १०० च्या आत होती.

मात्र, आता ती १०९ वर पोचली आहे. ग्रामीण भागाचा बाधित दर हा ५ च्या खाली अद्यापही आलेला नाही. त्यानुसार हॉटस्पॉट बाधित गावातील ग्रामसेवक, गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वरील सूचना केल्या.

अधिक वाचा  एसटी कर्मचारी संपावरून देवेंद्र फडणवीसांनी केली टीका, “मेस्मा लावण्याऐवजी राज्य सरकारने.”

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात दोन महिन्यांपासून सक्रिय बाधित रुग्णांची संख्या ही कमी झाली आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ही अद्यापही आटोक्यात येत नसल्याने धडक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ४२ गावांत रुग्ण वाढत आहे. ही रुग्णवाढ रोखण्याच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली.

रूग्णवाढ रोखण्यासाठी या गावात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात यावे. गावात धडक सर्वेक्षण मोहीम राबवून अॅटीजन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. संशयितांचे गृहविलगीकरण करण्याऐवजी त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याच्याही सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.

अधिक वाचा  प्रियांका चतुर्वेदी यांनी निलंबनाच्या निषेधार्थ सोडले अँकरिंग

१० तालुक्यांतील ४२ गावांत रुग्णवाढीचा ट्रेन्ड

जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ४२ गावांत गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णवाढ होत असल्याचे दिसून आले आहे. आंबेगाव, बारामती, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, शिरूर तालुक्यातील ही गावे आहेत. ही वाढ रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहे.

रुग्णवाढ होत असलेली गावे

आंबेगाव : जारकरवाडी, जवळे, वळती,

बारामती : चाैधरवाडी, मोरगाव
दौंड : बेटवडी, देऊळगाव गाडा, देऊळगाव राजे, केडगाव, लिंगाळी, वरवंड

हवेली : नऱ्हे

इंदापुर : बावडा, हागरवाडी, कळंब, माळवडी, शेटफळगडे

जुन्नर : अळू, बोरी सालवडी (बोरी खुर्द), धोलवड, डिंगोरे, जलवंडी, मालवडी, पादीरवाडी, पिंपरी पेंढार, पूर, शिरोली तर्फे कुंकंदनेर.

अधिक वाचा  राज्याच्या हवाई निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; नियम सुसंगतीची सूचना

खेड : बिराडवाडी, खरपूड, कोयाळी

मावळ : भाजे, काल्हाट, सालुंब्रे, टाकवे खेर
मुळशी : म्हारूंजी, सुस,

शिरूर : कवठे, केंदूर, कोरेगाव भीमा, पाबळ, सादलगाव, सविंदने

धडक सर्वेक्षणामुळे हॉटस्पॉट गावात रुग्ण माेठ्या प्रमाणात सापडत आहेत. यामुळे उपाययोजना करण्यात सहकार्य होत आहे. हॉटस्पाॅट गावांची संख्या कमी करण्याचे आमचे उद्दिष्ट असून या सर्वेक्षणाचा फायदा होईल. काही गावांत रुग्ण वाढत असल्याने या गावात पूर्ण लॉकडाऊन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रत्येक घरटी तपासण्या करण्याच्याही सूचना केल्या आहेत.

-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी