पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामास भेट देऊन पाहणी केली. उर्वरित काम गतीने वेगाने पूर्ण करावे आणि उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दीपक पोटे, अमोल बालवडकर, माजी नगरसेविका अल्पना वर्पे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरु असलेल्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजन आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने पाटील यांनी भेट दिली. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल, सेवा रस्ता उभारण्यात येत आहे. लवकरच सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती कदम यांनी यावेळी पाटील यांना दिली. पुणेकरांसाठी चांदणी चौक अत्यंत महत्त्वाचा आहे. कामात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. पावसाची शक्यता लक्षात घेऊन उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या.

अधिक वाचा  LIVE मॅचमध्ये राडा; हार्दिक पांड्याच नाव घेताच चाहत्याला लाथा-बुक्क्यानी मारहाण