भोपाळ: ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपशी जवळीक केल्याची चर्चा सुरू झाल्याने मध्य प्रदेशात राजकीय भूकंप आला आहे. राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जाणारे ज्योतिरादित्य यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने खळबळ उडाली आहे. ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव शिंदे यांचे काँग्रेसशीच नाही तर गांधी घराण्याशी जवळचे संबंध होते. त्यांची संजय गांधी यांची चांगली मैत्री होती. इंदिरा गांधी यांच्याशीही त्यांचे उत्तम राजकीय आणि कौटुंबिक संबंध होते. या बातमीबरोबरचा फोटो स्वतः ज्योतिरादित्य शिंदे यांनीच पूर्वी Twitter वर शेअर केलेला जुना फोटो आहे. संजय गांधी यांचा विमान अपघात झाला, त्या वेळी त्या विमानात माधवराव शिंदे असू शकले असते. पण अखेरच्या क्षणी संजय गांधी यांनी एकट्याने विमान चालवण्याचा निर्णय घेतला. ते त्यांचं शेवटचं उड्डाण ठरलं.
ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचं दिल्लीत पहिल्यापासून प्रस्थ होतं. काँग्रेसशी आणि त्यातूनही गांधी घराण्याशी माधवराव शिंदे यांचे चांगले संबंध होते. माधवराव शिंदे यांची आई विजयाराजे शिंदे यांची जनसंघाशी जवळीक होती. त्या भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होत्या. सुरुवातीला माधवरावसुद्धा जनसंघाचं काम करायचे. पण त्यानंतर गांधी घराण्याशी असलेल्या संबंधांसाठीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माधवराव शिंदे आणि संजय गांधी दोघांनीही विमान उडवायचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि स्वतःच विमान उडवत विहरणं हा दोघांचाही आवडता छंद होता.
माधवराव शिंदे आणि संजय गांधी दोघेही सफदरजंग विमानतळावरून विमानउड्डाण करायचे. संजय गांधी यांच्याकडे त्यांचं आवडतं पिट्स एस-2 ए हे लाल रंगाचं विमान आलं होतं. जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर हे विमान सरकारने जप्त केलं होतं. ते परत मिळाल्यानंतर संजय आणि माधवराव एकत्रितपणे हे विमान उडवण्यासाठी सफदरजंगवर जाणार होते. पण 1980 सालातल्या त्या सकाळी माधवराव शिंदे यांना लवकर जाग आली नाही. त्यामुळे संजय गांधी एकटेच विमानतळावर पोहोचले आणि त्यांनी एकट्यानेच उड्डाण केलं. ते संजय गांधी यांचं शेवटचं उड्डाण ठरलं. 23 जून 1980 रोजी सफजरजंगजवळच त्यांचं विमान क्रॅश झालं आणि त्यात संजय गांधी यांचा अंत झाला.