गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये एक घटना घडली होती. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा बूट भटक्या कुत्र्याने पळवला होता. त्या चोर कुत्र्याच्या शोधासाठी पालिकेची यंत्रणाच कामाला लागली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तीन संशयित कुत्र्यांना ताब्यात घेतले. मात्र त्यातील चोर कुत्रा कुठला हे मात्र समजत नव्हते. अखेर त्या कुत्र्याची ओळख पटली आहे. त्याला पकडून सेंट्रल नाका ‘लॉकअप’मध्ये (कोंडावडा) ठेवण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील एका बहाद्दर अधिकाऱ्याने फोनसाठी तलावातून पाणी उपसले होते. या संतापजनक घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमधील ही घटना समोर आली. माजी महापौर असलेले घोडेले यांचा १५ हजार रुपयांचा बूट भटक्या कुत्र्याने पळवला.

अधिक वाचा  इकडून नव्हे तिकडून जा, पुण्यात वाहतुकीत बदल, मोदींच्या सभेनिमित्त मोठा निर्णय

तक्रारीनंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तीन संशयित कुत्र्यांना ताब्यात घेतले. त्यातील खरा चोर कुत्रा शोधण्यासाठी श्वान पकडणाऱ्या पथकाची दमछाक झाली. आता चोर कुत्र्याची ओळख पटली आहे. त्यांचे इतर साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांना सेंट्रल नाका येथील कोंडावड्यात ठेवले आहे.

माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचे इटखेडा भागात निवासस्थान आहे. ते शनिवारी (ता. १०) रात्री घरी आले. त्यांनी नेहमीप्रमाणे आपला बूट दारासमोर काढला होता. सकाळी पाहतात तर एक बूट गायब होता. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर बूट कुत्र्याने नेल्याचे समोर आले. त्यामुळे घोडेले यांनी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाला फोन केला. त्यांनी परिसरात मोकाट श्वान वाढले असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी सूचना केली. तसेच आपला बूटच श्वानाने नेल्याचेही तक्रार केली. यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती.

अधिक वाचा  माहिती अधिकार कार्यकर्त्याला शासकीय इमारतीच्या आवारात मारहाण; मुक्त पत्रकारावर गुन्हा दाखल

आता चोर कुत्रा सापडला असला तरी त्याने पळवलेला बूट मात्र काही हाती लागलेला नाही. या कुत्र्यावर काय कारवाई होणार याकडे शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या कुत्र्याची नसबंदी करून त्याला सोडण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, या कारवाईमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न थांबणार का, असा प्रश्न छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.