आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला आता वेग आला आहे. विधिमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तत्कालीन शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवून घेतली आहे.त्यासाठी औपचारिक पत्रही देण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येत्या पावसाळी अधिवेशनाआधी मोठा निर्णय येऊ शकतो, अशी माहिती विधिमंडळातील खात्रीलायक सूत्रानी दिली आहे. या कार्यवाहीत गरज पडली तर लवकरच दोन्ही गटाच्या प्रमुखांना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना देखील सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना म्हणणं मांडण्याची संधी दिली शक्यता आहे, तसंच गरज भासल्यास दोन्ही नेत्यांची उलटतपासणीही घेतली जाईल. तसंच दोन्ही गटांना पुरावेही सादर करावे लागणार आहेत. खरी शिवसेना कोणाची याबाबत अध्यक्ष आधी निर्णय घेतील, अशीही माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आमदार निलंबनाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

अधिक वाचा  ठाकरे गटाला राज्यात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का?; चित्रा वाघ यांचा घणाघाती आरोप

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
काही दिवसांपूर्वी मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केलं. निर्णय आत्ता सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असं सूचक वक्तव्य नार्वेकरांनी केलं होते. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. महाराष्ट्राच्या या केसच्या सुनावणीदरम्यान अध्यक्षांकडे निर्णय देताना कालमर्यादा असावी की नाही यावरही युक्तीवाद झाले होते. म्हणजे शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनीही हवं तर अध्यक्षांना 2-3 महिन्यांत निर्णय घ्यायला सांगा, पण निर्णय तेच घेतील असं म्हटलं होतं.

नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष?
शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. शिवसेनेतील बंडानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप आला आणि राज्यात राजकीय सत्तासंघर्ष उद्भवला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निकालानंतर आमदार निलंबनाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टोलवला आहे. त्यामुळे आता शिवसेनेतून बंड करत बाहेर पडलेले ते आमदार पात्र की, अपात्र हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. कोणाचे आमदार पात्र आणि कोणाचे आमदार अपात्र? हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांच्याकडे तर आहेच, मात्र कोणाचा गट हा खरा पक्ष आहे? हे ठरवण्याचे अधिकार देखील राहुल नार्वेकर यांच्याकडेच आहेत, असं राहुल नार्वेकरांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. अशातच आता राहुल नार्वेकरांनी क्रांतीकारी निर्णयाबाबत केलेल्या सूचक वक्तव्यामुळे आता नार्वेकर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा  काही लोकं फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. डॉ. कोल्हेंचा आढळरावांवर घणाघात.