मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी अरविंद केजरीवाल आणि भगवान मान यांच्यासोबत एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलेल्या एका निर्णयाबद्दल आभार मानले आहेत.

“आजच माझ्या कानावर आलं की जे माझ्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचं नाव बदलण्याचा निर्णय घेतलेला. या प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. म्हणून मी आता असलेल्या महाराष्ट्र सरकारला धन्यवाद. कारण आम्ही घेतलेल्या निर्णयांपैकी या निर्णयांना त्यांनी मंजुरी दिली. माझ्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत सोबतच्या इतर पक्षाच्या सहकाऱ्यांनी देखील या निर्णयाला होकार दिलेला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिक वाचा  हे तीर्थस्थानी फेअरवेल तर मोक्ष मिळतो; राजकारणातून संपलेला अध्याय संजय राऊतांची मोदींवर खोचक टीका

दरम्यान, पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्याबद्दल उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्यावरही उत्तर दिलं. “ते आता खूप जुने गोष्टी काढायला लागले होते. त्यांच्याकडे सगळा रेकॉर्ड असेल तो जरुर काढावा”, असं ठाकरे म्हणाले. याशिवाय फडणवीस ठाकरेंना आपले शत्रू नाहीत, असं उद्देशून म्हणाले आहेत. त्यावर ठाकरेंनी उत्तर दिलं. “आम्हीसुद्धा त्याच मानसिकतेत आहोत की, ज्या पद्धतीने ते ठाकरे कुटुंबासोबत वागत आहेत ते पाहता देशातील लोकशाही फक्त 75 वर्षे राहणार आहे का? आम्ही कधीच सुडाचं राजकारण केलेलं नाही”, असं ते म्हणाले.

अधिक वाचा  जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांची ना माफी ना दिलगिरी; म्हणाले, ‘यापुढे…’

औरंगाबादच्या नामांतराला केंद्राकडून मंजुरी
औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला. औरंगाबादसह उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला. या दोन्ही शहरांच्या नव्या नावांचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलेला. अखेर केंद्र सरकारने दोन्ही नावांच्या नामांतरासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहराला अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराला धाराशिव असं म्हटलं जाणार आहे. सर्व शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये तसा उल्लेख केला जाईल.

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात आधी औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर व्हावं, अशी मागणी केलेली. बाळासाहेब ठाकरे यांची औरंगाबाद शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 8 मे 1988 रोजी सभा झालेली. या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी याबाबतची मागणी केलेली. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून ही मागणी लावून धरण्यात आली होती. औरंगाबादमधील प्रत्येक निवडणुकीत नामांतराच्या मुद्द्यावरुन राजकारण पेटायचं. अखेर राज्य सरकारने याबाबत निर्णय काही दिवसांपूर्वी घेतलेला. त्यानंतर आता केंद्र सरकारने देखील नामांतराला मंजुरी दिली आहे.