पुणे : ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यासह आणखी दोघांवर पिंपरी चिंचवडमध्ये हल्ला झाल्याची बातमी समोर आलेली. संबंधित घटना ही दोन दिवसांपूर्वी थेरगाव येथे घडलेली. सचिन भोसले मतदार स्लिप वाटत असताना त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. त्यांच्यावर ब्लेडने वार करण्यात आले होते. दुसरीकडे कसब्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानिमित्ताने पुण्यात आले. त्यांच्या नेतृत्वात कसब्यात रोड शो आयोजित करण्यात आला. या सगळ्या घडामोडींदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत हिंसाचार होत असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे गुंडांना सोबत घेऊन काही मंत्री फिरत असल्याचं विधान अजित पवारांनी केलं.

अधिक वाचा  “सहा महिने थांबा, आणखी एकाचा बळी जाणार…” सुप्रिया सुळे यांचा मोठा गौप्यस्फोट

“गुंडांना सोबत घेऊन काही मंत्री फिरत आहेत, अशा बातम्या देखील पाहायला मिळाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटाच्या शहराध्यक्षांवर हल्ला झाला. बिहार, युपीसारखं होत चाललं आहे. तिथे अशा घटना घडतात असं आम्ही ऐकलं होतं”, असं अजित पवार म्हणाले. “हे म्हणत होते निवडणूक एकतर्फी आहे. पण ज्या पद्धतीने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आले ते पाहता ही निवडणूक चुरशीची झालीय. आम्हाला दोन्ही ठिकाणी यश मिळेल हा विश्वास आहे”, असा दावा अजित पवारांनी यावेळी केला.

“न्यायालयाने निर्णय देण्यापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्याचा वादग्रस्त निर्णय दिलाय. जनतेच्या न्यायालयात त्याबाबत निर्णय होईल. पोटनिवडणुकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोड शो केलेला मी पहिल्यांदाच पाहिला. अजूनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठान मांडून आहेत”, असा टोला अजित पवारांनी लगावला.

अधिक वाचा  पुण्यातील ‘या’ भागात तयार होणार ग्रीन फील्ड एअरपोर्ट ! भूसंपादनासाठी एमआयडीसी 3500 कोटी उभारणार

अजित पवार यांचं शिवसेनेवर भाष्य
“अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे शिवसेनेचे बंडखोर नाहीत. त्यांना पक्षातून काढून टाकले आहे. आम्ही शिवेनेला संपवण्याचं काम केलेलं नाही. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभेतही सांगितलं की काँग्रेस-राष्ट्रवादीला साथच दिली. शिवसेना कुणी संपवली याचं आत्मचिंतन त्यांनी करावं”, असं अजित पवार म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. “सगळ्यांना माहीत आहे कुणी त्यांना कुठे पाठवले. हे सर्वांना माहीत आहे. नंतर त्यांनीच सांगितलं की आम्ही त्यांना फोन करून बोलवले”, असं अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  महायुतीच्या नव्या आमदारांचा कालावधी किती? कोणाला दीड, कोणाला 2 वर्षे, तर शिवसेनेला 4 तर यांना सर्वाधिक

“भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी अन्याय कुणावर झाला हे पहावं. कुणाला एबी फॉर्म मिळाला नाही, कुणाला मंत्रिपद मिळालं नाही ते बघा”, असा चिमटा अजित पवार यांनी काढला. तसेच लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका घेण्याच्या शक्यता आहे, असंदेखील ते यावेळी म्हणाले.