पुणे – कॉंग्रेस भवन. लाखो कार्यकर्त्यांचे स्फुर्तीस्थान. 2009 पुर्वी याच कॉंग्रेस भवनाच्या परिसरात प्रत्येक निवडणुकीत विजयाचा गुलाल मुक्तपणे उधळला जात होता. त्यानंतर मात्र कॉंग्रेस भवन परिसरात गुलाल उधळण्याची संधीच कार्यकर्त्यांना मिळाली नाही. आता एक, दोन नव्हे तर तब्बल 13 वर्षांनी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा विधानसभेच्या निवडणुकीत विजय झाला आणि कॉंग्रेस भवनाच्या त्याच आवारात कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा गुलाल अंगावर घेण्याची सुवर्णसंधी मिळाली !

ऐतिहासिक पार्श्‍वभुमी असलेल्या कॉंग्रेस भवनाला उमेदवारांचे विजय, त्यामुळे साजरा केला जाणारा जल्लोष कधीच नवीन नव्हता. 2009 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाचे रमेश बागवे हे पर्वती मतदारसंघातुन विजयी झाले. त्याचबरोबर शिवाजीनगर मतदारसंघातुन विनायक निम्हण हेदेखील विजयी झाले. दोघांच्या विजयाचा जल्लोष कॉंग्रेस भवनामध्ये साजरा झाला. गुलालाची मुक्तहस्ते उधळणही करण्यात आली. त्याचवेळी बागवे यांच्या गळ्यात गृहराज्यमंत्री पदाची माळही पडली. त्यानंतर झालेल्या 2014, 2019 या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये शहरातील कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले नाहीत.

अधिक वाचा  महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला मोठी भेट; स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच हस्ते होणार लोकार्पण

केवळ विधानसभा, लोकसभाच नव्हे, तर महापालिका निवडणुकीतही कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या विजयाचे प्रमाण घटले. 2007 मध्ये 46, त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत 28 तर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत अवघ्या 9 जागांवर कॉंग्रेसला समाधान मानावे लागले. 2012 मध्ये कॉंग्रेसला उपमहापौरपदावर समाधान मानावे लागले. या निवडणुका वगळता कॉंग्रेस भवनामध्ये विजयाचा मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्याची संधी 2009 नंतर कार्यकर्त्यांना मिळाली नाही.

अखेर 2023 च्या 2 मार्चला रविंद्र धंगेकर यांच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना कॉंग्रेस भवनाच्या आवारात अंगावर गुलाल उधळण्याची संधी मिळाली. त्यामुळे अंगावर गुलाल टाकलेले कॉंगेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील विजयाचा हा आनंद ओसांडून वाहत होता.

अधिक वाचा  राज ठाकरे-उद्धव ठाकरे येऊ शकतात एकत्र, ‘ही’ आहेत पाच कारणं! जाणून घ्या सविस्तर