रायपूर येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेसनासाठी देशभरातील काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत. मात्र, हे अधिवेशन सुरू असतानाच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रीय अधिवेशन सुरू असतानाच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात विदर्भातील २१ नेत्यांनी बंड केले आहे. नाना पटोलेंना हटवा आणि शिवाजी मोघे यांना प्रदेशाध्यक्षपद द्या, अशी मागणीच काँग्रेसच्या विदर्भातील २१ नेत्यांनी पक्षाचे निरीक्षक रमेश चिन्निथाला यांच्याकडे केली आहे. पटोले हे काँग्रेसची वोटबँक असलेल्या दलीत, मुस्लीम, आदिवासींच्या विरोधात आहेत. ते मनमानी करतात. ते कुणाचेही ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना हटवा, अशी मागणी प्रदेश काँग्रेस सचिव खान नायडू, सदस्य प्रदेश काँग्रेस कमिटी प्रकाश मुगदीया, सरदार महेंद्र सिंग सलूजा, इक्राम हुसैन यांच्यासह काँग्रेसच्या २१ पदाधिकाऱ्यांनी रमेश चिन्निथाला यांची भेट घेत त्यांच्याबबात तक्रार केली.

अधिक वाचा  घाटकोपरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करताना पेट्रोल पंपाला आग, मृतांची संख्या वाढली

तसेच पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी हे नेते काँग्रेस हायकमांडला देखील भेटणार असल्याचे सचिव खान नायडू यांनी सांगितलं. तर याआधी आशिष देशमुख यांनीही काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष बदलवा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान तांबे यांनीही पटोलेंवर आगपाखड केली होती. तर बाळासाहेब थोरात आणि पटोले यांच्यामध्येही मध्यंतरी वाद रंगला होता. मात्र, वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर त्यावर पडदा पडला.

दरम्यान, आता पुन्हा एकदा महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस बाहेर आली असून नाना पटोले यांच्याविरोधात विदर्भातीलच काही नेते त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पक्षाच्या वरीष्ठांना भेटणार आहेत. प्रदेशाध्यक्ष पद हे शिवाजी मोघे यांना द्या, अशी मागणी करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील ही धूसफूस रायपूर येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देखील समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यावर काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.