सांगली , मिरज, कुपवाड महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षामधील अन्य एक पदाधिकारी यांच्यामधील फ्री-स्टाईल हाणामारी टक्केवारीसाठीच झाल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकारामुळे महानगरीची पुरती बेअब्रू झाली आहे. पार्टी विथ डिफरन्स असा टेंभा मिरवणाऱ्या भाजपचा हाच का चेहरा? असे म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज केली.

सांगली महापालिकेतील स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर आवरात ही हाणामारीची घटना घडलेली आहे, असेही काँग्रेसचे पाटील यांनी नमूद केले आहे. त्याची चर्चा जोरदारपणे सांगलीत होत आहे. मागेही एकदा टक्केवारीवरूनच भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये महापालिकेत असा प्रकार घडला होता, अशी आठवणीही त्यांनी सांगितली.

अधिक वाचा  ‘म्हणूनच चित्राताईला पॉर्न फिल्म पात्रांचा परिचय’; त्यांची याप्रकारे बदनामी तर आम्ही कारवाई करणार: अंधारेंचा पलटवार

भाजप पदाधिकाऱ्यांमधील ही हाणामारी चक्क महापालिकेच्या आवारातच घडलेली आहे. त्यांच्याकडे महापालिकेतील एकच महत्त्वाचे पद आहे, तरी एवढी हाणामारी झाली. आख्खी महापालिका ताब्यात असती, तर त्यांनी ती विकायलाही मागे पुढे पाहिले नसते. भारतीय जनता पक्ष हा सुसंस्कृत लोकांचा पक्ष आहे, असा डांगोरा पिटणाऱ्या आमदारांचे हाणामारी करणारे हे डावे आणि उजवे पदाधिकारी आहेत. हाच का त्यांचा सुसंस्कृतपणा? यावर ते गप्प का? असा सवालही पृथ्वीराज पाटील यांनी उपस्थित केला आहे.

महापालिका स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर ही हाणामारी झाली आहे. प्रभाग क्रमांक नऊमधील चैत्रबन नाल्याच्या दहा कोटींच्या कामाच्या टेंडरवरून स्थायी समितीचे अध्यक्ष आणि भाजप पदाधिकाऱ्यामध्ये ही हाणामारी झाली आहे. अर्थातच, त्यामागे टक्केवारीचे गणित आहे, हे लोक विकासासाठी भांडत नाहीत, तर टक्केवारीसाठी भांडतात. मागेही एकदा टक्केवारीवरूनच भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये महापालिकेत असा प्रकार घडला होता. भाजपचा हा चेहरा नागरिकांच्या समोर उघड झाला आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.