वर्धा : पुरात अख्खे शेत वाहून गेले. प्रचंड नुकसान झाले. यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या पढेगाव येथील शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले. जिवंत विद्युत तार थेट तोंडात घेऊन मरणाला कवटाळले. ही हृदयद्रावक घटना देवळी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या पढेगाव येथे घडली. गणेश श्रावण माडेकर (वय ३६, रा. पढेगाव) असे या तरुण मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश माडेकर यांच्याकडे साडेसहा एकर शेती आहे. त्यांनी यंदा तूर, सोयाबीन व कपाशी पिकाची लागवड केली. पीक अंकुरले. दरम्यान, अचानक अतिवृष्टी झाली. गावातून वाहणाऱ्या भदाडी नदीला आलेल्या पुरात गणेश माडेकर यांच्या शेतातील संपूर्ण पीक खरडून गेले. यात त्यांचे मोठे नुकसान झाले. उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय पथकाने वर्धा जिल्ह्यात दाखल होत विविध भागातील नुकसानाची पाहणी केली. लवकरच शासकीय मदत शेतकऱ्यांना मिळेल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप करण्यात आली नाही.

अधिक वाचा  शरद पवार मनामध्ये असते तेच करतात, दाखवताना मात्र सामूहिक निर्णय दाखवतात…अजित पवार यांचा हल्लाबोल

अस्मानी संकटाने गणेश माडेकर हवालदिल झाले. मनोधैर्य खचल्याने शेवटी गणेश यांनी टोकाचा निर्णय घेतला. प्रवाहित वीजतार तोंडात धरून आपली जीवनलीला संपविली. या प्रकरणी सावंगी मेघे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. गणेश माडेकर यांच्या पश्चात पत्नी रोमावती (वय ३१), आठ वर्षांचा मुलगा तेजस, सहा वर्षांची मुलगी प्राजक्ता आणि वृद्ध आईवडील आहेत.

नुकताच झाला कृषिमंत्र्यांचा दौरा

नुकसानाची पाहणी करण्यासंदर्भात जिल्ह्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यानंतर केंद्रीय पथक तसेच शुक्रवारी (ता. १९) राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे दौऱ्यावर होते. त्यांनी पढेगाव येथे नुकसानाची पाहणी केली. दरम्यान, त्याच दिवशी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सुरुवातीला विजेचा धक्का लागून आकस्मिक मृत्यू असल्याचे जाणवले. मात्र, पोलिसांनी घेतलेल्या बयाणात पती गणेश माडेकर यांनी आत्महत्या केल्याचा खुलासा त्यांच्या पत्नीने केला.

अधिक वाचा  नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना फाशी का नाही? सीबीआयच्या वकिलांनी सांगितलं सविस्तर कारण

या गावांत झाले नुकसान

भदाडी नदीच्या पुराचा वर्धा तालुक्यातील पढेगाव, सेलसुरा, सालोड, चिकणी, जामनी, निमगाव, दहेगाव आदी भागांतील शेतपिकांना चांगलाच फटका बसला आहे. या भागातील नुकसानाचे पंचनामे व सर्वेक्षण करण्यात आले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.