गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने घोषणा केलेल्या हर घर तिरंगा मोहीमेची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक घरी तिरंगा पोहोचवण्याचं काम स्थानिक प्रशासनासोबतच अनेक स्वयंसेवी संस्था देखील करत आहेत. मात्र, या मोहिमेवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. या आरोप-प्रत्यारोपांमध्येच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होऊ लागला असून यामध्ये भाजपाचं चिन्ह आणि नाव असलेले झेंडे भाजपा कार्यकर्ते वाटत असल्याची तक्रार काही लोक प्रशासकीय अधिकाऱ्याकडे करताना दिसत आहेत. यासंदर्भात काँग्रेसकडून परखड शब्दांत टीका करण्यात आली आहे.

नेमकं झालं काय?

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे हा व्हिडीओ परभणीमधला असून स्थानिक भाजपा कार्यकर्ते भाजपाचं चिन्ह आणि नाव असलेले झेंडे वाटत असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या दृश्यांमध्ये भाजपा लिहिलेली बाजू घडी करून एक झेंडा काँग्रेसचे परभणीतील आमदार सुरेश वरपुडकर हे प्रशासकीय अधिकाऱ्याला दाखवत आहेत. या प्रकाराची तक्रार देखील केली जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

अधिक वाचा  बारामतीत आमदारकीची ‘साखर पेरणी’ सुरू झाली का?; लोकआग्रहास्तव जनता दरबार अन् पुतण्याने ‘दंड’ थोपटले

“भाजपानं देशाची माफी मागावी”

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर त्यासाठी भाजपानं देशाची माफी मागितली पाहिजे, असं सचिन सावंत ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. “अतिशय संतापजनक…भाजपाचे कार्यकर्ते परभणीमध्ये भाजपाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असलेले राष्ट्रध्वज लोकांना वाटत होते. हा देशद्रोह नाही तर काय आहे? काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी पोलीस अधीक्षकांकडे यासंदर्भात तक्रार केली. भाजपानं याची जबाबदारी घेऊन देशाची माफी मागितली पाहिजे”, असं सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.