भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभरात १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवले जात आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर स्वयं स्फूर्तीने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा या हेतूने सदर अभियान राबवले जात आहे. सदर अभियान राबवित असताना भारतीय ध्वजसंहितेचे पालन झाले पाहिजे. अजाणतेपणी राष्ट्रध्वजाच्या अपमान होणार नाही याबाबत दक्षता घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कोथरूड महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपविभाग अध्यक्ष संजय काळे, सचिन विप्र यांनी सहाय्यक आयुक्त कोथरूड क्षेत्रीय कार्यालय व कोथरूड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन दिले आहे.

अधिक वाचा  … नाहीतर माझं काही खरं नाही… अजित पवार यांनी प्रचारात सांगितला

भारतातील नागरिकांसाठी राष्ट्रध्वज ही अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानाची बाब आहे. भारतीय ध्वजसंहितेनुसार तिरंगा ध्वजाची विशिष्ट रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वज तीन रंगांच्या पट्ट्यांचा असावा. तो समान रुंदीच्या तीन आयताकृती पट्ट्या किंवा जोडपट्ट्यांचा मिळून बनलेला असावा. सर्वांत वरची पट्टी केशरी रंगाची असावी, खालची पट्टी हिरव्या रंगाची, तर मधली पट्टी पांढऱ्या रंगाची असावी. तिच्या मध्यभागी समान अंतराच्या २४ आऱ्यांचे आकाशी निळ्या रंगाचे अशोक चक्राचे चिन्हं असावे. अशोक चक्र हे ध्वजाच्या दोन्ही बाजूंनी पांढऱ्यापट्टीच्या मध्यभागी पूर्णतः दिसेल असे असावे.
राष्ट्रध्वजाची कुठल्याही प्रकारे अवहेलना होणार नाही अनादर होणार नाही किंबहुना राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जाईल याची काळजी घेणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.
सदर अभियान राबविण्यात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जोमाने कार्यरत असून घरोघरी तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रध्वजाचे वाटप केले जात आहे. आमच्या असे निदर्शनास आले आहे की, अनावधानाने या यंत्रणेद्वारे कोथरूड मधील काही प्रभागात राष्ट्रध्वजाचे वाटप हे ध्वजसंहितेचे पालन न करता करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने ध्वजाचा आकार २:३ या गुणोत्तरानुसार नसून (आयताकृती) वेड्यावाकड्या आकारात चूकीच्या पध्दतीने शिलाई करुन अशोक चक्र हे पांढऱ्या रंगाच्या पट्टीमध्ये मध्यभागी घेण्याऐवजी एका बाजूला घेऊन गोल ऐवजी अंडाकृती आकारात घेण्यात आले आहे. त्यामुळे ध्वजसंहितेचे पालन होण्याऐवजी राष्ट्रध्वजाचा अपमान होत असल्याचे निदर्शनास येत आहे. आपण वाटप यंत्रणेची सखोल चौकशी करून राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही तर राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जाईल याबाबत दक्षता घ्यावी. अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.