सोलापूर: दलित युवा पॅंथर चा कार्यकर्ता असलेल्या अतिश बनसोडे या तरुणाने आज गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही हा प्रकार घडला.
राज्यात दलितांवरील अन्यायाविरुद्ध पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचे सांगत दलित युवा पॅंथरच्या दोघा कार्यकर्त्यांनी हे निषेध आंदोलन केले. गृहमंत्री व आरोग्यमंत्र्यांचा ताफा अडवून बनसोडे या तरुणाने निवेदनाच्या प्रती भिरकावल्या. त्याला व अन्य एका तरुणाला लगेचच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दलितांवरील अन्यायाविरुद्ध सरकारवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर अनिश बनसोडे हा तरुण अन्य कार्यकर्त्यास सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचला. त्याच्या हातात निवेदन होतं. मंत्र्यांचा ताफा दाखल होताच हा तरुण ताफ्यासमोर आला. त्याने दलितांवरील अन्याय दूर झालेच पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. तिथे आधीपासूनच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत या बनसोडे व त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले. त्यानंतर जवळच असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये या दोघांना नेण्यात आले.
बनसोड यांच्या मृत्यूने संताप
नागपूर जिल्ह्यातील नरखेडमध्ये पिंपळधरा येथे आंबेडकरी चळवळीतील एक कार्यकर्ते अरविंद बनसोड यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी दलित संघटनांकडून सातत्याने होत आहे. बनसोड यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
बनसोड यांची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली आहे. मात्र पोलीस ही आत्महत्या असल्याचा बनाव करीत आहेत. मारेकऱ्यांचे राजकीय लागेबांधे असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे. भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद, रिपब्लिकन पक्ष, ऑल इंडिया पँथर सेना यांनीही बनसोड यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी नि:पक्षपातीपणे चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत तपास करण्यात येत आहे. दुसरीकडे पुण्यातील पिंपरी येथील पिंपळे सौदागरमध्ये विराज जगताप या तरुणाची निर्घृण हत्या झाल्यानेही त्यावरून तीव्र संताप व्यक्त होत आहेत. या कुटुंबाचीही गृहमंत्री देशमुख यांनी भेट घेतलेली आहे. याप्रकरणी योग्यती कारवाई करण्याचे आश्वासन देशमुख यांनी जगताप कुटुंबाला दिलेले आहे. या कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदतही देण्यात आली आहे.