नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार देण्याचा औपचारिक निर्णय आज (ता. १८) विरोधी पक्षीय नेत्यांच्या बैठकीत झाला. विरोधकांतर्फे उमेदवारीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा गळ घालण्यात आली. मात्र, त्यांच्या नकारानंतर गोपालकृष्ण गांधी, डॉ. फारुख अब्दुल्ला ही नावे पुढे आली आहेत. परंतु, यावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही, त्यासाठी विरोधकांची पुढील बैठक २१ जूनला अपेक्षित आहे. तोपर्यंत शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे आणि ममता बॅनर्जी हे नेते सर्व विरोधी पक्षांशी संभाव्य नावांबाबत चर्चा करणार आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी बोलाविलेली विरोधकांची बहुचर्चित बैठक आज दिल्लीतील ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’मध्ये झाली. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, ‘द्रमुक’चे टी. आर. बालू, शिवसेना नेते आणि महाराष्ट्रातील मंत्री सुभाष देसाई व प्रियांका चतुर्वेदी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, ‘पीडीपी’च्या मेहबूबा मुफ्ती, ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे उमर अब्दुल्ला यांच्यासह मुस्लिम लीग, आरएसपी, राष्ट्रीय जनता दल, माकप, भाकप, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. देवेगौडा व त्यांचे पुत्र कुमारस्वामी, राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी, भाकप (माले)चे दीपांकर भट्टाचार्य, झारखंड मुक्ती मोर्चा आदी १८ पक्षांचे नेते उपस्थित होते.

अधिक वाचा  रणजितसिंह मोहिते-पाटील अद्याप भाजपमध्येच तरीही अकलूजमध्ये फडणवीसांनी पुष्पगुच्छ स्वीकारला नाही

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दीड तासांहून अधिक वेळ चाललेल्या या बैठकीमध्ये राष्ट्रपती निवडणुकीसोबतच केंद्र राज्य संबंध, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर यासारख्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. या बैठकीमध्ये बॅनर्जींनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींविरुद्ध सुरू असलेल्या ‘ईडी’च्या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. विरोधकांच्या एकजुटीचा संदेश देण्यासाठी बोलाविलेल्या याबैठकीकडे अन्य विरोधी पक्षांपैकी बिजू जनता दल, आम आदमी पक्ष, एनडीएला सोडचिठ्ठी देणाऱ्या शिरोमणी अकाली दल, के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समिती या पक्षांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. तर, बहुजन समाज पक्षाला निमंत्रण देण्यात आले नव्हते, असेही समजते.

अधिक वाचा  पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग! निवडणूक आयोगाने 29 एप्रिलपर्यंत मागितले उत्तर

ममता बॅनर्जींनी गोपाळकृष्ण गांधी त्याचप्रमाणे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला या नावांचाही प्रस्ताव मांडला. मात्र, उमर अब्दुल्ला यांनी संभाव्य नावांवर आपआपसांत चर्चा करणे योग्य ठरेल, असे सुचविल्यानंतर सहमतीचा उमेदवार देण्याबाबतचा सर्व पक्षीय ठराव मंजूर करण्यात आला. काँग्रेसने कोणत्याही उमेदवाराच्या नावावर विचार केलेला नसून चर्चेअंती सहमतीचा उमेदवार निवडला जाईल, असे मल्लिकार्जुन खर्गे यांचे म्हणणे होते. बैठकीनंतर खुद्द शरद पवार यांनी ट्विट करून उमेदवारीचा प्रस्ताव नाकारल्याचे आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कार्य करणार असल्याचे स्पष्ट केले.

बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये सुधींद्र कुलकर्णी यांनी विरोधी पक्षांनी संमत केलेला ठराव वाचून दाखवला. आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी सहमतीचा एकच उमेदवार देण्यात येईल. हा उमेदवार राज्यघटनेचे रक्षण करणारा तसेच भारतीय लोकशाही आणि सामाजिक व्यवस्थेचे आणखी नुकसान करण्यापासून मोदी सरकारला रोखणारा असावा, असे या ठरावात नमूद करण्यात आले. विरोधी पक्षांची आजची बैठक प्राथमिक स्वरूपाची असली तरी प्रामुख्याने गोपाळकृष्ण गांधी यांचे नाव आघाडीवर असून संभाव्य नावांबाबत अन्य विरोधी पक्षांसमवेत शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे आणि ममता बॅनर्जी चर्चा करणार आहे.

अधिक वाचा  आढळरावांना पराभव दिसला म्हणून कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा – डॉ. अमोल कोल्हे

‘एनडीए’ची जबाबदारी राजनाथ सिंह यांच्याकडे

सत्ताधारी ‘एनडीए’ने राष्ट्रपती निवडणूक सहमतीने व्हावी यासाठी सर्व पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सोपविली आहे. याअंतर्गत राजनाथसिंह यांनी मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांच्याशी संपर्क साधून उमेदवार सुचविण्यास सांगितले आहे. मात्र, या नेत्यांनी ‘एनडीए’चा उमेदवार कोण आहे ते आधी सांगावे? अशी विचारणा त्यांच्याकडे केली. त्यावर उत्तर मिळाले नसल्याचेही या नेत्यांचे म्हणणे होते.