आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ज्या धारावीचा उल्लेख केला जातो, त्या ठिकाणी एकही करोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडू नये यासाठी पालिका प्रशासन आणि आरोग्ययंत्रणेने जीवाचे रान केले. पण रात्री उशिरा लो. टिळक रुग्णालयामध्ये दाखल धारावीमधील एका रुग्णाचा मृत्यू हा करोनाच्या संसर्गामुळे झाला. हा रुग्ण राहत असलेल्या परिसरातील आठ इमारतींमधील ३०८ सदनिकांमधील व्यक्तींना घरामध्येच विलग करण्यात आले आहे. मात्र धारावीसारख्या दाटीवाटीच्या ठिकाणी ही ‘चैन’ सर्वसामान्यांना परवडणार कशी, असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला.
धारावीमधील झोपडीवजा घरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जी घरे थोडीबहुत पक्की आहे त्यांमध्ये एकच खोली आहे. आतल्या बाजूलाच जमिनीच्या पायऱ्या उघडून बनवलेली उघडबंद करता येतील अशी बैठी शौचालये आहे. त्यामुळे त्याचाही वापर केला जातो. एका घरामध्ये राहणाऱ्यांची संख्या आठ ते दहा आहे. रात्री अनेकजण बाहेरही झोपतात. करोना संसर्ग होऊ नये यासाठी आरोग्ययंत्रणेसह पोलिसांची गस्तही सातत्याने वाढते आहे. तरीही सामान्यांना मजबुरीमुळे बाहेरच राहावे लागते, असे धारावी परिसरात राहणाऱ्या विमल पाटील यांनी सांगितले.
कामराज नगर, रमाबाई आंबेडकर नगरमध्ये घरी विलगीकरण केलेल्या अनेक व्यक्ती बाहेर फिरत आहेत. झोपड्यांमध्ये सतत बसून राहणे शक्य नसल्याचे सांगून त्या बाहेर येतात. त्यामुळे परिसरातील लोकांसोबत त्यांचे वादही होतात. या लोकांना कामराज नगर मधील अनेक रहिवाशांनी दुकानांमध्ये सामान भरताना तसेच फिरतानाही पाहिले आहे. हातावर मारलेले शिक्के तेलाचा तसेच इतर द्रव्याचा वापर करून काढून टाकण्याचाही प्रयत्न होतो. संशयित म्हणजे करोना झाला असे नाही, असाही युक्तिवाद करून भांडणे केली जातात.
सार्वजनिक शौचालयांचा वापर
अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचा वापर या व्यक्तींकडून केला जातो. शौचालयांची अन्य सुविधा नसेल तर लोक कुठे जाणार, असा प्रश्न एम. जी. पेरिगल यांनी विचारला. त्यामुळे विलगीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तातडीने सुविधा उपलब्ध करण्याची व्यवस्था संबधित यंत्रणेने केली आहे. दाटीवाटीच्या परिसरामध्ये संसर्गाचे प्रमाण वेगाने वाढेल, अशा वेळी या वस्तीसाठी वेगळा विचार करण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
दुसरी लागण
धारावीमध्ये एका सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पालिकेचा ५२ वर्षीय सफाई कर्मचारी हा वरळीचा रहिवासी होता, त्याच्यामध्ये करोनाची लक्षणे आढळल्याने अधिकाऱ्यांनी त्याला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले होते.

अधिक वाचा  महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा पावसाबाबत मोठा इशारा