अमेरिकेच्या अर्थमंत्रालयाकडून शुक्रवारी एक अहवाल संसदेत सादर करण्यात आला. या अहवालामध्ये भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करण्यात आले आहे. भारताने कोरोनाच्या तीन लाटांचा सामना केला, मात्र तरी देखील आर्थिक आघाडीवर भारताने जोरदार पुनरागम केल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे. अर्थमंत्रालयाने आपल्या अर्धवार्षिक अहवालात म्हटले आहे की, भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने 2021 च्या मध्यापर्यंत अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम केला. या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था जवळपास ठप्प झाली होती. मात्र कोरोना लाट वसरताच भारताने अवघ्या काही महिन्यांमध्ये आपली अर्थव्यवस्था रुळावर आणली आहे. या अहवालात भारताच्या लसीकरण मोहिमेचे देखील कौतुक करण्यात आले आहे. भारताने युद्धपातळीवर लसीकरण राबवले, त्याचाच परिणाम म्हणजे आज देशात कोरोना लाट अटोक्यात आल्याचे अमेरिकेच्या अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

अधिक वाचा  ‘सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय’; पंतप्रधान मोदी

अर्थव्यवस्थेला चालना

अमेरिकेच्या अर्थमंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, 2021 च्या शेवटी भारतात जवळपास 44 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले होते. कोरोनापूर्व काळात भारताचा आर्थिक विकास दर जवळपास आठ टक्क्यांच्या आसपास होता. मात्र त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या लाटेचा आर्थिक विकास दराला मोठा फटका बसला. लॉकडाऊन काळात सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प होते. तसेच बेरोजगारीमध्ये देखील वाढ झाली होती. मात्र 2021 च्या शेवटी कोरोना लाटेचा प्रभाव कमी होताच भारताने पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला चालना दिली. त्याचा परिणाम म्हणजे आज भारताची अर्थव्यवस्था कोरोनापूर्व काळाच्या जवळपास पोहोचल्याचे देखील या अहवालामध्ये म्हटले आहे. तसेच 2021 च्या शेवटी आलेल्या ओमिक्रॉनच्या लाटेत भारतातील मृत्यूदर अत्यंत कमी होता असं देखील हा अहवाला सांगतो.

अधिक वाचा  एकनाथ खडसेंची ‘घरवापसी’ यामुळे का अडकली? समोर आली मोठी अपडेट

पुढे या अहवालात म्हटले आहे की, कोरोना काळात जगातील जवळपास सर्वच देशांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी आपले रोजगार गमावले होते. अशा लोकांना भारत सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्याचे काम केले. लॉकडाऊन काळात भारत सरकारकडून अनेक योजना राबवण्यात आल्या. त्याचा मोठा फायदा हा तेथील जनतेला झाला. भारतीय रिझर्व्ह बँकेने कोरोना काळात आपला रेपो रेट स्थिर ठेवला होता. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाल्याचे देखील या अहवालात म्हटले आहे.