पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्कीचा वाद आता अजून पेटण्याची शक्यता आहे. कारण, सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे भाजपच चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी भाजपचं शिष्टमंडळ आज पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलं होतं. त्यात महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह भाजप नगरसेवकांचा समावेश होता. या भेटीनंतर बोलताना जगदीश मुळीक म्हणाले की, आम्ही पोलीस कारवाईवर समाधानी नाही. महाविकास आघाडी सरकार पोलिसांवर दबाव आणत आहे. त्यांना हिंसा करत महापालिकेत सत्ता आणायची आहे. यापुढे कलम वाढवून नवीन कलमं लावली पाहिजेत, अशी मागणी भाजपकडून करण्यात येतेय.

अधिक वाचा  … आता एआय करणार सगळं काम! पुण्यातील तरुणांनी उभारलं ‘अमेझॉन-गो’ स्टाईलचं 24×7 ग्रोसरी स्टोअर

इतकंच नाही तर भाजपकडून पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांना पुण्यात येण्याचं निमंत्रण देण्यात येणार आहे. 11 फेब्रुवारी रोजी किरीट सोमय्या यांना पुण्यात बोलावलं जाणार आहे. महापालिकेच्या पायऱ्यांवर सोमय्या यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याच पायऱ्यांवर सोमय्या यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहितीही जगदीश मुळीक यांनी दिलीय. 11 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता सोमय्या यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं पुणे भाजपकडून सांगण्यात आलं.

शिवसैनिकांविरोधात गुन्हा

दुसरीकडे सोमय्या हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल असलेले शहरप्रमुख संजय मोरे, युवा सेना सहसचिव किरण साळी यांच्यासह सात जण शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. शनिवारी घडलेल्या प्रकाराबद्दल शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह किरण साळी, सुरज लोखंडे, चंदन साळुंके, आकाश शिंदे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे सनी गवते या आठ जणांवर 143,149, 147,341, 337 व 336 या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ला प्रकरणी सनी गवते हा शिवसैनिक पोलिसांसमोर हजर झाला होता. सनी गवते या शिवसैनिकाची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर आज इतर शिवसैनिक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोहोचले.

अधिक वाचा  दोन खासदांना उमेदवारी का नाही? एकनाथ शिंदेंनी सांगितलं…

सोमय्या राज्यपालांच्या भेटीला

दरम्यान, आपल्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी पुण्यात घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती सोमय्या यांनी राज्यपालांना दिली आहे. दरम्यान, आपण केंद्रीय गृहसचिवांनाही याबाबत माहिती देणार आहोत. गृहमंत्र्यांचीही भेट घेणार आहोत, अशी माहिती सोमय्या यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिलीय.