पुणे : लसीच्या तुडवड्यामुळे तसेच ज्येष्ठ नागरिकांचा दुसरा डोस देण्यात यावा तसेच लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी १८ वर्षांपुढील तरुणांचे लसीकरण जिल्ह्यात थांबविण्यात आले. ज्येष्ठ नागरिक, हेल्थ वर्कर तसेच फ्रंटलाइन वर्कर यांना प्राधान्याने पहिला आणि दुसरा डोस देण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र, असे असले तरी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ११ लाख ६ हजार ९९७ जणांचेच लसीकरण पूर्ण झाले आहे. यात ४५ वर्षांपुढील ५४ टक्के नागरिकांनी पहिला तर केवळ १० टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याने जिल्ह्यात लसीकरण मोहीम संथ गतीनेच चालू आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे जिल्ह्यातील ज्येष्ठांचे लसीकरण जणू ठप्पच झाले आहे. लसीकरण कोणत्या वयोगटाला करायचे याचा प्राधान्यक्रम ठरत नसल्याने जिल्ह्यात लसीकरणाचा बोजवारा उडाला आहे. ४५ वर्षांवरील ५० टक्के नागरिकांना अद्याप केवळ पहिलाच डोस मिळाला आहे. तर दुसरा डोस फक्त १० टक्के नागरिकांना मिळाला आहे. हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स त्यासोबत ४५ वयापेक्षा पुढील नागरिकांच्या लसीकरणाला प्रशासनाने प्राधान्य दिले. मात्र, लसींचा तुटवडा असल्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण मोहीम संथ गतीने सुरू होती. त्यात पुणे, पिंपरी-चिंचवडच्या तुलनेत ग्रामीण भागाचा विचार केल्यास मिळणाऱ्या लसींच्या डोसची संख्या ही कमी होती. यामुळे क्षमता असतानाही ग्रामीण भागात लसीकरण मोहीम ही वेगाने राबविता आली नाही.

अधिक वाचा  आढळरावांना पराभव दिसला म्हणून कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा – डॉ. अमोल कोल्हे

सर्वात आधी हेल्थ वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत १०४ टक्के हेल्थ वर्कर्सनी पहिला डोस घेतला आहे. तर केवळ ५३ टक्के जणांनी दुसरा डाेस घेतला आहे. लसीकरण मोहीम सुरू होऊन अनेक दिवस उलटूनही अजूनही ४७ टक्के वर्कर्सचा दुसरा डोस घेण्याचे बाकी आहे. हीच स्थिती फ्रंटलाइन वर्कर्सची आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १२० टक्के आहे तर केवळ ५२ टक्के जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षांपुढील ५४ टक्के नागरिकांनीच पहिला डोस घेतला आहे. अद्याप ४६ टक्के नागरिक पहिल्या डोसपासून वंचित आहे. तर केवळ १० टक्के जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षांपुढील ९० टक्के नागरिकांना दुसरा डोस घेणे अद्याप बाकी आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील १ टक्के तरुणांनी पहिला डोस घेतला आहे.