पुणे: पावसाने ओढ दिल्याने पुणे जिल्ह्यातील २३ धरणांपैकी अकरा धरणांतील पाण्याने तळ गाठला असून, पिंपळगाव जोगे हे धरण पूर्ण रिकामे झाले आहे. पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये अवघे ५.६५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ‘निसर्ग ’ चक्रीवादळामुळे सलग दोन ते तीन दिवस धरणांमध्ये पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. पिंपळगाव जोगे या धरणामध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. या धरणासह अकरा धरणांतील पाणी तळाला गेले आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी टेमघर धरण हे दुरुस्तीच्या कामासाठी रिकामे आहे. उर्वरित तीन धरणांपैकी वरसगाव धरणात १.९६ टीएमसी, पानशेत धरणात २.३८ टीएमसी आणि खडकवासला धरणात १.१८ टीएमसी पाणीसाठा राहिला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
पिंपळगाव जोगे या धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. माणिकडोह या धरणामध्ये अवघे ०.३६ टीएमसी पाणी आहे. याशिवाय येडगाव धरणात ०.६३ टीएमसी, वडज धरणात ०.१५ टीएमसी, घोड धरणात ०.४१ टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे. विसापूर धरणामध्ये ०.२५ टीएमसी, कळमोडी धरणात ०.०९ टीएमसी, चासकमानमध्ये ०.६५ टीएमसी, वडीवळे धरणामध्ये ०.२१ टीएमसी, कासारसाई धरणात ०.१९ टीएमसी आणि नाझरे धरणात ०.११ टीएमसी पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
उजनीतील उपयुक्त जलसाठा संपला
सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात काठोकाठ भरले होते. मात्र, सध्या या धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. या धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ५३.५७ टीएमसी आहे. हे सर्व पाणी संपले असून, उपयुक्त पाणीसाठ्याचे प्रमाण उणे १०.०८ झाले असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

अधिक वाचा  एअर इंडियाचा केबिन क्रू ला जोरदार दणका, एकाचवेळी इतक्या जणांना नोकरीवरुन काढलं?