आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीवर प्रशासनाचा वॉच राहणार आहे. त्यामुळे यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक काळातील गैरप्रकाराना आळा घालण्यासाठी प्रशासन सज्ज असून सोशल किंवा डिजिटल माध्यमांवरून डीपफेक व्हिडिओ, क्लिप्स, प्रसारित करण्यासारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यात येणार आहे. त्यासोबतच असा प्रकार करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी लवकरच मतदान होणार आहे. या निवडणुकीदरम्यान डीपफेक व्हिडिओ, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो सोशल किंवा डिजिटल माध्यमांवरून प्रसारित कारणांऱ्यावर कडक कारवाईचे आदेश सरकारने दिले आहेत. यासंदर्भात पोलिस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. अशा घटना घडल्यास सीआयडी (CID) चौकशी केली जाणार आहे.

अधिक वाचा  कोथरूडला गदिमा जयंतीनिमित्त ‘गीतरामायण’ हिंदी भावानुवाद पहिला प्रयोग: नामदार चंद्रकांतदादा पाटलांचे आयोजन

निवडणुकीदरम्यान फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यासारख्या विविध तंत्रांचा गैरवापर करून डीप फेक व्हिडिओ, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करण्यात येतो. या तंत्राचा गैरवापर हा चिंतेचा विषय आहे. यामध्ये एखादा उमेदवार, राजकीय पक्ष किंवा निवडणुकीच्या मुद्द्याविषयी चुकीचे व्हिडिओ, ऑडिओ, फोटो तयार करण्यात येतात किंवा खऱ्या फोटो, ऑडिओ, व्हिडिओमध्ये फेरफार करून ते चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येतात, अशा गैरपद्धतीने तयार केलेले डीप फेक व्हिडिओ, क्लिप्स किंवा फोटो खरे असल्यासारखे भासतात आणि त्यामुळे संबंधिताविषयी गैरसमज किंवा बदनामी होते.

निवडणूक काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असून यावर आळा घालण्यासाठी तसेच स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने डीप फेक कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा  अंकिता वालावलकर हिच्यावर भडकले सूरज चव्हाणचे चाहते, बिग बॉसच्या घरात सूरजसोबत हैराण करणारा प्रकार आणि…

अशा स्वरूपाच्या गैरप्रकारांवर त्वरित नियंत्रण मिळविणे तसेच त्वरित कायदेशीर कारवाई सुरू करण्याच्या अनुषंगाने, अशा घटनांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारमार्फत पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत.

कसा असतो डीपफेक व्हिडिओ

डीपफेक हा एका व्यक्तीचा व्हिडिओ असतो आणि त्यात त्याचा चेहरा दुसऱ्या चेहऱ्यावर बसविण्यात येतो. ही कृती मशिन लर्निंग (एमएल) किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा मदतीने केली जाते. अलीकडेच अशाच प्रकारे गृहमंत्री अमित शहा यांचा डीपफेक व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून युवा कॉंग्रेसच्या सोशल मीडिया हँडल आणि सोळा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला होता.

अधिक वाचा  बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना ‘आश्चर्यकारक’दिलासा! आधी न्यायालयीन कोठडी आता दोघांना जामीनही मंजूर

चारपैकी एका भारतीयास करावा लागतोय डीपफेकचा सामना

मॅकअफे रिपोर्टनुसार गेल्या वर्षभरात ७५ टक्के भारतीय कोणत्या ना कोणत्या माध्यमातून डीपफेक व्हिडिओ आणि फोटोच्या संपर्कात आले आहेत. चारपैकी एका भारतीयास राजकीय डीपफेकचा सामना करावा लागला आहे. २२ टक्के नागरिकापर्यंत पोचलेला डीपफेक फोटो किंवा व्हिडिओ, ऑडिओ क्लिप ही एक वेळ खरे असल्याचे वाटले. खऱ्या बातमीच्या तुलनेत खोटी बातमी अधिक व्हायरल होण्याचे प्रमाण ७० टक्के अधिक असते, त्यामुळे याबाबत अधिक दक्ष राहण्याची गरज असल्याचे मॅसाचुसेट्स इन्स्टिट्‌यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधनात म्हटले आहे.