मुंबई : पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या गुप्त भेटीमुळं महाविकास आघाडीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अजितदादांचं मुख्यमंत्रीपद आणि शरद पवार कनेक्शन जोडलं होतं. तसेच काँग्रेसकडं प्लॅन बी तयार असल्याचे संकेतही दिले होते. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत थेट सांगितलं आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटींनतर राज्याच्या राजकारणात शरद पवारांच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला मागे सोडून काँग्रेस आणि शिवसेना पुढली पावलं टाकू शकतात, हा काँग्रेसकडं बी प्लॅन असल्याची चर्चा सुरु आहे.

अधिक वाचा  ‘पुणे अर्बन सेल’च्या वतीने गुडलक चौकात आंदोलन; वाहनचालक जनजागृती आणि सत्ताधारी प्रशासनाचा निषेध

याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पटोले म्हणाले, काँग्रेससाठी महाराष्ट्र कायम पाया राहिला आहे. राज्यातील सर्व भागात काँग्रेसची वोट बँक आहे. महाराष्ट्रातील वोट बँकेच्या मदतीनं आमच्या आघाडीत जे सहकारी पक्ष आहेत त्यांना पूर्ण ताकद दिली जाणार आहे. महाराष्ट्रातून भाजपला मुळापासून उखडून टाकण्याचा जो प्लॅन आम्ही बनवला आहे तोच आमचा बी प्लॅन आहे. यासाठी आम्ही तयारी सुरु केली आहे.

काँग्रेसकडून शरद पवारांबाबत कोणताही संभ्रम नाही. जनतेत जो संभ्रम निर्माण झाला आहे ज्या प्रकारच्या चर्चा सुरु आहेत, याबाबत आम्ही त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं काँग्रेसकडून शरद पवारांबाबत कोणताही संभ्रम नाही. हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न असून ३१ तारखेला मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत दूर करतील.

अधिक वाचा  कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचीही ‘तयारी’ जोशतच; ‘इच्छुक’ विजय डाकले यांच्या १५०मंडळांना उत्स्फूर्त भेटी

बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?
काँग्रेसची आज कोअर कमिटीची बैठक पार पडली, या बैठकीत नेमकी कुठल्या विषयांवर चर्चा झाली याबाबतही नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पटोले म्हणाले, ३ सप्टेंबरपासून काँग्रेसची राज्यात पदयात्रा सुरू होत आहे, याच्या पूर्वतयारीबाबत चर्चा झाली. नुकतेच आम्ही राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात जे निरिक्षक पाठवले होते, त्याचा आढावा आम्ही घेतला.