भारतीय हवामानशास्र विभाग (IMD) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस (INCOIS) यांच्याद्वारे प्राप्त माहितीनुसार, आज शनिवार दिनांक 4 मे 2024 रोजी सकाळी 11.30 वाजेपासून ते रविवार दिनांक 5 मे 2024 रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत 36 तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हा इशारा लक्षात घेता, समुद्र किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये या उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी 0.5 मीटर ते 1.5 मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी, येत्या 36 तासाच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे. तसेच मच्छिमार बांधवांनी योग्य दक्षता घ्यावी. सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

अधिक वाचा  पुण्यात अण्णा की भाऊ गुलाल कुणाचा? भाजपा आणि काँग्रेसची ही बलस्थाने

अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा हा इशारा लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी महानगरपालिकेच्या सर्व सहायक आयुक्त यांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यांच्या मदतीने नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः उन्हाळी सुटीच्या निमित्ताने समुद्र किनाऱ्यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उंच लाटांमुळे किनारपट्टी भागात रहिवास असलेल्या नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी बाळगावी, असे देखील आवाहन करण्यात येत आहे.

अधिक वाचा  घाटकोपर होर्डींग अन् पेट्रोल पंप सर्वच अनधिकृत! अशी ‘लिम्का बुक’मध्ये नोंद: मात्र व्यवस्थेने असे झटकले हात…

मच्छिमारांना प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना

किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना या कालावधीत किनाऱ्यावर सुरक्षित अंतरावर बोटी ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जेणेकरून उसळणाऱ्या लाटांमुळे एकमेकांना धडकून बोटींचे नुकसान होणार नाही, समुद्रात मच्छिमारी करताना खबरदारी घेण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.

या संपूर्ण परिस्थितीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस तसेच इतर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. पर्यटक व किनारपट्टीवर वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांनी या कालावधीत घाबरून न जाता दक्ष राहावे, समुद्रात शिरू नये. तसेच समुद्र किनारी तैनात असलेले महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक, जीवरक्षक तसेच अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.