पुणे – पुणे शहर लोकसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान झालेल्या कोथरूड आणि वडगाव शेरी हे दोन मतदार संघ विजयावर अंतिम मोहोर उमटविणार आहे. त्यांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, त्यावर पुण्याचा नवा खासदार ठरणार असल्याचे मतदानाच्या अंतिम आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शहरातील लोकसभा मतदार संघातील मतदानाची अंतिम टक्केवारी मंगळवारी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली. त्यानुसार पुणे शहरात ५३.५४ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये ४९.८४ टक्के मतदान झाले होते. गेल्यावेळेपेक्षा मतदानात ३.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये १० लाख ३५ हजार २३६ मतदारांनी मतदान केले होते. या वेळेस ११ लाख ०३ हजार ६७८ मतदारांनी मतदान केले. यंदा ६८ हजार ४४२ ने मतदान वाढले आहे. हा वाढलेला टक्का कोणाला फायद्याचा ठरणार, यावर विजयाची गणिते ठरणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी पहिल्याच टप्प्यात जाहीर केली. त्यामुळे मोहोळ यांना प्रचारासाठी सुमारे दीड महिन्यांहून अधिक कालावधी मिळाला. तर, धंगेकर यांची उमेदवारी पक्षांतर्गत स्पर्धेमुळे काँग्रेसने शेवटी जाहीर केली. भाजपला गेल्या दोन निवडणुकांत या मतदारसंघातून तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या झालेल्या जाहीर सभा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची देखरेख, नेटकी प्रचार यंत्रणा यामुळे भाजपला पुण्यातील निवडणूक सोपी वाटत होती. प्रत्यक्षात मतदानापूर्वी शेवटच्या टप्प्यात धंगेकर यांनी चांगले आव्हान निर्माण केले.
त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, आम आदमी पार्टी आणि समाजावादी संघटनांची चांगली रसद मिळाली. त्यातच काँग्रेस हायकमांडने विदर्भातील 10 आमदार पुण्यात पाठविले. ते हायकमांडला रोज अहवाल देत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील पुण्यावर लक्ष ठेवून होते. शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडी एकसंध झाल्याचे प्रतिबिंब मतदानात उमटले.
वडगाव शेरी
वडगाव शेरीमध्ये सर्वाधिक म्हणजे 4 लाख ६७ हजार ६६९ मतदार होते. लोकसभेच्या निकालात या मतदारसंघातील मताधिक्य निर्णायक ठरणार असल्याने त्यावर भाजप आणि महाविकास आघाडीने लक्ष केंद्रित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत असल्यामुळे टिंगरे आणि लोकसवभा इच्छुक जगदीश मुळीक यांनी प्रचाराचा भार उचलला. गेल्या निवडणुकीत भाजपला ५६ हजार ७५७ मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे भाजपला मताधिक्याची खात्री आहे तर, येथे काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा असल्याने धंगेकर यांना मताधिक्याची खात्री आहे.
कोथरूड
भाजपचा बालेकिल्ला कोथरूडमध्येही मतदारसंख्या 4 लाख १४ हजार ७५५ असून 2 लाख १७ हजार ४५५ मतदारांनी हक्क बजावला. येथे मताधिक्य मिळाले तर, विजयच असे भाजपचे गृहितक आहे. म्हणूनच धंगेकर यांनी कोथरूड मध्ये आटोकाट प्रयत्न केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मतपेढी अन् काही ठिकाणीची काँग्रेसी ‘पॉकेट’ यावरच धंगेकर यांची भिस्त आहे.
पर्वती
पर्वती विधानसभा मतदारसंघ भाजपला गड समजला जातो. लोकसभेच्या मागील निवडणुकीत या मतदारसंघाने भाजपला ६७ हजार मताधिक्य दिले होते. परंतु, आता परिस्थितीत बदल झाला आहे. येथे काँग्रेसचाही मतदार आहे. त्यामुळे झालेल्या १ लाख ८९ हजार १८४ मतदानातील मोठा वाटा भाजपकडे जाण्याची शक्यता असली तरीही धंगेकरांना येथे लक्षणीय मते मिळू शकतात.
पुणे कँटोन्मेंट
कोथरूड आणि पर्वतीमध्ये मिळणारे मताधिक्य विजयासाठी पुरेसे ठरेल, असे भाजपच्या वर्तुळात सांगितले जाते. कँटोन्मेंट हा कायमच काँग्रेसला अनुकूल मतदारसंघ असला तरी, सलग दोन निवडणुकांत येथे विजय मिळविण्याची किमया भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी साधली आहे. या मतदारसंघात मुस्लीम, ख्रिश्चन आणि दलित मतदार मोठ्या संख्येने आहेत. एकगठ्ठा मतदान, महाविकास आघाडीच्या बाजूने राज्यात असलेली लाट यामुळे कँटोन्मेंटमध्ये मताधिक्याची काँग्रेसला अपेक्षा आहे.
पुर्ण शहराचा एकूण विचार केला तर, कोथरूड, पर्वती या दोन मतदारसंघामधील मताधिक्यावर भाजपची मदार आहे तर, वडगाव शेरी, कँटोन्मेंट, शिवाजीनगर आणि कसबा या दोन मतदारसंघामधील मताधिक्यावर महाविकास आघाडीची भिस्त आहे. भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये झालेली लढत सुरुवातीला एकतर्फी वाटत होती परंतु एकूण मतदानामध्ये ६८ हजार मतदान वाढले आहे. त्याचा टक्का कोणाच्या पारड्यात पडणार, यावर पुण्याचा निकाल अवलंबून राहणार आहे.